घरक्रीडा'या' फलंदाजाने केले तब्बल ११ वर्षांत पहिले शतक! 

‘या’ फलंदाजाने केले तब्बल ११ वर्षांत पहिले शतक! 

Subscribe

फवादच्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकात तब्बल ४२१८ दिवसांचा फरक होता.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज फवाद आलमसाठी मात्र हा सामना महत्वाचा ठरला. फवादने या सामन्याच्या दुसऱ्या डावात २६९ चेंडूत १०२ धावांची खेळी केली. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील दुसरे आणि ११ वर्षांत पहिले शतक ठरले. फवादने याआधीचे २००९ मध्ये केले होते. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना श्रीलंकेविरुद्ध २५९ चेंडूत १६८ धावांची खेळी केली होती. फवादच्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकात तब्बल ४२१८ दिवसांचा फरक होता. दोन कसोटी शतकांमध्ये सर्वाधिक कालावधी असणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचे वॉरेन बर्ड्सली (५०९३ दिवस) आणि भारताचे मुश्ताक अली (४५४४ दिवस) यांच्या खालोखाल फवादचा क्रमांक लागतो.

फवादच्या शतकानंतरही पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४३१ धावांची मजल मारली होती. याचे उत्तर देताना पाकिस्तानला २३९ धावाच करता आल्याने न्यूझीलंडला पहिल्या डावात १९२ धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडने दुसरा डाव ५ बाद १८० धावांवर घोषित करत पाकिस्तानसमोर सामना जिंकण्यासाठी ३७३ धावांचे आव्हान ठेवले.

- Advertisement -

याचा पाठलाग करताना पाकिस्तानची ४ बाद ७५ अशी अवस्था होती. मात्र, फवाद (१०२) आणि कर्णधार मोहम्मद रिझवान (६०) यांनी १६५ धावांची भागीदारी रचत पाकिस्तानला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे दोघे बाद झाल्यावर इतरांना चांगली फलंदाजी न करता आल्याने पाकिस्तानचा डाव २७१ धावांत आटोपला. त्यामुळे न्यूझीलंडने सामना १०१ धावांनी जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -