घरक्रीडाHockey World Cup 2018 : वर्ल्ड कपमध्ये हॉलंडविरुद्ध भारताची पाटी कोरीच; उपांत्यपूर्व...

Hockey World Cup 2018 : वर्ल्ड कपमध्ये हॉलंडविरुद्ध भारताची पाटी कोरीच; उपांत्यपूर्व फेरीत २-१ असा पराभव

Subscribe

वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विजेत्या हॉलंडने भारताचा २-१ असा पराभव करून उपांत्य फेरीत रुबाबात प्रवेश केला.

४३ वर्षांनंतर वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न हवेतच विरले. कलिंग स्टेडियमवर १५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विजेत्या हॉलंडने भारताचा २-१ असा पराभव करून उपांत्य फेरीत रुबाबात प्रवेश केला. त्यामुळे वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेत हॉलंडविरुद्ध भारताची विजयाची पाटी कोरीच राहिली आहे. वर्ल्ड कपमध्ये हॉलंडविरुद्धच्या ७ सामन्यांत हा भारताचा सहावा पराभव आहे. तर एक सामना १-१ असा बरोबरीत संपला होता.

मध्यंतरापर्यंत १-१ बरोबरी 

उपांत्यपूर्व फेरीतील या सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी आक्रमणाचा प्रयत्न केला. सामन्याच्या ८ व्या मिनिटाला हॉलंडला गोल करण्याची संधी मिळाली. पण त्यांना गोल करता आला नाही. मग भारताने आक्रमक खेळ केल्याने त्यांना १२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर गोल करून आकाशदीप सिंगने भारताचे खाते उघडले. त्याने गोल केल्यानंतर कलिंग स्टेडिअमवर गर्दी करणाऱ्या भारताच्या १५ हजार चाहत्यांनी जल्लोष केला खरा पण त्यांचा आनंद जेमतेम ३ मिनटे टिकला. १५ व्या मिनिटाला थिएरी ब्रिन्कमनने मैदानी गोल करून हॉलंडला बरोबरी साधून दिली. यानंतर चेंडूचा ताबा हॉलंडच्या तुलनेत भारताकडे किंचित जास्त होता. पण आघाडीच्या खेळाडूंचा सदोष खेळ तसेच कर्णधार मनप्रीत सिंगच्या ढिलाईमुळे मिळालेल्या संधींचा फायदा घेण्यात भारतीय संघ कमी पडत होता. तर भारताच्या बचावफळीने चांगला खेळ केल्यामुळे हॉलंडच्या आघाडीच्या खेळाडूंना गोल करता आला नाही. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सामन्यात १-१ अशी बरोबरी होती.

हॉलंड दहाव्यांदा उपांत्य फेरीत

मध्यंतरानंतर हॉलंडने अधिक आक्रमक खेळ केला. त्यांना काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले. पण त्यांना गोल करण्यात अपयश येत होते. सामना संपण्यास १० मिनिटे बाकी असताना हॉलंड पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर मिंक वॅन डर विर्डेनने गोल करून हॉलंडला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ५३ व्या मिनिटाला अमित रोहिदासला पिवळे कार्ड मिळाल्याने भारताला पुढील ५ मिनिटे १० खेळाडूंनी खेळावे लागले. पण भारताने गोल करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले. ५७ व्या मिनिटाला गोलरक्षक श्रीजेशच्या जागी आघाडीचा खेळाडू खेळवण्याचा धाडसी निर्णय भारताने घेतला. पण यानंतर भारताला गोल न करता आल्याने त्यांनी हा सामना २-१ असा गमावला. त्यामुळे दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचे भारताचे स्वप्न अधुरेच राहिले. तर हॉलंडने दहाव्यांदा वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत त्यांचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होईल.

सामना १३ विरुद्ध ११ असा झाला – हरेंद्र सिंग

    सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी पंचांवर जोरदार टीका केली. हा सामना १३ (११ हॉलंडचे खेळाडू + २ पंच) विरुद्ध ११ असा झाला असे ते म्हणाले. त्यांनी आपण पंचांवर अतिशय नाराज असल्याचे म्हटले. हॉलंडने केलेले दोन्ही गोल योग्य असले तरी दुसऱ्या गोलआधी मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. तसेच ५३ व्या मिनिटाला अमित रोहिदासला मिळालेल्या पिवळ्या कार्डवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पंचांचे काही निर्णय आम्हाला अजिबातच पटले नाहीत असे हरेंद्र सिंग म्हणाले.

– शरद कद्रेकर 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -