घरक्रीडाIND vs AUS : दुसऱ्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव; ऑस्ट्रेलिया १४६ धावांनी...

IND vs AUS : दुसऱ्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव; ऑस्ट्रेलिया १४६ धावांनी विजयी

Subscribe

ऑस्ट्रेलियाने या विजयामुळे त्यांनी ४ सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा दुसऱ्या कसोटी सामन्यात १४६ धावांनी पराभव केला. या विजयामुळे त्यांनी ४ सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. या मालिकेचा पहिला सामना भारताने ३१ धावांनी जिंकला होता. दुसऱ्या सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारताला जिंकण्यासाठी १७५ धावांची आवश्यकता होती. तर त्यांच्या ५ विकेट शिल्लक होत्या. पण पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजीमुळे भारताला आपल्या धावसंख्येत अवघ्या २८ धावांची भर घालता आली आणि त्यांनी हा सामना गमावला.

तळाचे फलंदाज अपयशी

पाचव्या दिवशी हा सामना जिंकण्यासाठी भारताला मैदानात असलेल्या हनुमा विहारी आणि रिषभ पंत यांच्याकडून मोठ्या धावांची गरज होती. मात्र असे झाले नाही. दिवसाच्या सहाव्या षटकात मिचेल स्टार्कने विहारीला २८ धावांवर माघारी पाठवले. तो बाद झाल्यानंतर पंतने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याने वेगवान गोलंदाजांना काही चांगले फटके लगावले. पण ऑफस्पिनर नेथन लायनच्या गोलंदाजीवर खराब फटका मारून तो बाद झाला. त्याने ३० धावा केल्या. पंत बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या ७ बाद १३७ अशी होती. यानंतर तळाच्या फलंदाजांना फारकाळ खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. स्टार्कने उमेश यादवला २ धावांवर बाद केले. तर पॅट कमिन्सने एकाच षटकात इशांत शर्मा (०) आणि जसप्रीत बुमराह (०) यांना माघारी पाठवत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताला २८७ धावांचा पाठलाग करताना अवघ्या १४० धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना १४६ धावांनी गमावला. सामन्यात ८ विकेट घेणाऱ्या लायनला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. आता या मालिकेतील तिसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया : ३२६ आणि २४३ विजयी वि. भारत : २८३ आणि १४० (अजिंक्य रहाणे ३०, रिषभ पंत ३०; लायन ३/३९, स्टार्क ३/४६, हेझलवूड २/२४, कमिन्स २/२५).
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -