घरक्रीडाभारत-ऑस्ट्रेलिया निर्णायक पाचवा वन-डे सामना आज

भारत-ऑस्ट्रेलिया निर्णायक पाचवा वन-डे सामना आज

Subscribe

वर्ल्डकप संघात एन्ट्री मिळवण्याची अखेरची संधी !

जगातील सर्वोत्तम गोलंदाजी करणारा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ३५९ धावा रोखता आल्या नाहीत आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने या मालिकेत २-२ अशी बरोबरी केली. आता या मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना बुधवारी राजधानी दिल्लीच्या फिरोझ शहा कोटला मैदानावर होणार आहे, तसेच हा सामना मे महिन्यात सुरू होणार्‍या विश्वचषकाच्या आधीचा अखेरचा एकदिवसीय सामना आहे. त्यामुळे रिषभ पंत, लोकेश राहुल, विजय शंकर यांच्यासारख्या खेळाडूंसाठी विश्वचषकाच्या संघात आपले स्थान पक्के करण्यासाठी ही अखेरची संधी आहे.

चौथ्या एकदिवसीय सामन्यात सपाट खेळपट्टीवर भारताच्या फलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३५८ धावांचा डोंगर उभारला. मात्र, या धावाही भारतासाठी कमी पडल्या. ऑस्ट्रेलियाने नवोदित अ‍ॅष्टन टर्नर (नाबाद ८४ धावा), पीटर हँड्सकॉम्ब (११७) आणि उस्मान ख्वाजा (९१) यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळे ३५९ धावांचे लक्ष्य २ षटके शिल्लक राखतच गाठले. या सामन्यात पुनरागमन करणार्‍या भुवनेश्वर कुमारने ९ षटकांतच ६७ धावा दिल्या, तसेच युझवेन्द्र चहलला १० षटकांत ८० धावा फटकावल्या.

- Advertisement -

मात्र, कोटलाच्या खेळपट्टीवर कुलदीप यादव आणि युझवेन्द्र चहल या फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता आहे. चौथ्या सामन्यात टर्नरच्या आक्रमणापुढे भरवशाचा जसप्रीत बुमराहसुद्धा निष्प्रभ ठरला. मात्र, कर्णधार विराट कोहलीने त्याला ज्याप्रकारे वापरले त्यावरही टीका झाली. या सामन्यात अनुभवी महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली होती. त्याची कमी कोहलीला नक्कीच जाणवली. भारताने क्षेत्ररक्षणातही बर्‍याच चुका केल्या. खासकरून युवा रिषभ पंतला हा सामना लवकरात लवकर विसरायला आवडेल. त्याला हँड्सकॉम्ब आणि टर्नर या दोघांनाही यष्टिचित करण्याची संधी होती. मात्र, दोन्ही वेळा संधीचा उपयोग त्याला करता आला नाही. त्यामुळे पाचवा सामना जिंकायचा असल्यास भारताला या चुका दुरुस्त कराव्या लागतील.

एकीकडे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भारताने चुका केल्या असल्या, तरी दुसरीकडे सलामीवीर पुन्हा फॉर्मात येणे ही भारतासाठी आनंदाची बाब होती. चौथ्या सामन्यात शिखर धवनने १४३ धावांची अप्रतिम खेळी केली. हे त्याचे १७ एकदिवसीय सामन्यांनंतर पहिले शतक होते. त्याचा साथी रोहित शर्माने ९५ धावा काढल्या, तसेच रिषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत २४ चेंडूंत ३६ धावा केल्या. त्यामुळे यष्टीरक्षक म्हणून नसले तरी फलंदाज म्हणून आपण विश्वचषकाच्या संघात असू शकतो हे त्याने दाखवून दिले. २ टी-२० सामन्यांत चांगले प्रदर्शन करणार्‍या लोकेश राहुललाही चौथ्या एकदिवसीय सामान्यत संधी मिळाली होती. त्याने या सामन्यात चांगली सुरुवात केली होती. मात्र, २६ धावा करून तो बाद झाला. अष्टपैलू विजय शंकरला या मालिकेच्या ३ सामन्यांत चांगली सुरुवात केल्यानंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यात पुन्हा एकदा संधी मिळाल्यास पंत, राहुल आणि शंकर यांना आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

- Advertisement -

पाचव्या सामन्यात कोटलाच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळेल, असा अंदाज असल्याने ऑस्ट्रेलियाच्या संघात ऑफस्पिनर नेथन लायनचे पुनरागमन होऊ शकेल. लायन या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना खेळला होता. मात्र, चौथ्या सामन्यासाठी त्याला वगळण्यात आले होते. एकूणच दोन्ही संघांतील खेळाडूंचे या सामन्यात चांगले प्रदर्शन करून आपल्या संघाला सामना जिंकवून देण्याचे आणि विश्वचषकाच्या संघात आपले स्थान पक्के करायचे लक्ष्य असेल, हे निश्चित.

दोन्ही संघांचे संभाव्य ११ खेळाडू

भारत – शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल/ अंबाती रायडू, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, रविंद्र जाडेजा/ युझवेन्द्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया – अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँड्सकोम्ब, ग्लेन मॅक्सवेल, अ‍ॅष्टन टर्नर, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, जाय रिचर्डसन, जेसन बेहरनडॉर्फ/ नेथन लायन, अ‍ॅडम झॅम्पा

सामन्याची वेळ – दुपारी १:३० वाजता
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -