घरक्रीडाभारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका अ‍ॅशेसइतकीच महत्त्वाची - लायन

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका अ‍ॅशेसइतकीच महत्त्वाची – लायन

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ही आता अ‍ॅशेसइतकीच महत्त्वाची होत चालली आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नेथन लायनने व्यक्त केले. महान लेगस्पिनर शेन वॉर्ननंतरचा सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन फिरकीपटू म्हणून लायनचे नाव घेतले जाते. मात्र, त्याच्या चांगल्या कामगिरीनंतरही मागील वर्षी भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीच्या भारतीय संघाने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. हा पराभव पचवणे लायन आणि त्याच्या ऑस्ट्रेलियन संघातील सहकार्‍यांना अवघड गेले. परंतु, यावर्षी त्यांना या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळणार आहे. ९६ कसोटीत ३९० गडी बाद करणारा लायन या मालिकेसाठी सज्ज आहे.

ऑस्ट्रेलियासाठी खेळताना आम्हाला सामना किंवा मालिका गमवायला अजिबातच आवडत नाही. मागील वर्षीच्या मालिकेत भारताने आमच्यापेक्षा दर्जेदार खेळ करत कसोटी मालिका जिंकली. त्यामुळे यंदाच्या मालिकेसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकाही आता अ‍ॅशेसइतकीच महत्त्वाची होत चालली आहे. भारताकडे फारच उत्कृष्ट खेळाडू आहेत. ते यंदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेसाठी येणार असून ही मालिका आव्हानात्मक आणि चुरशीची होईल याची मला खात्री आहे, असे लायनने सांगितले.

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन बलाढ्य संघांमध्ये यावर्षी चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. हे सामने अनुक्रमे ब्रिस्बन (३-७ डिसेंबर), अ‍ॅडलेड (११-१५ डिसेंबर), मेलबर्न (२६-२९ डिसेंबर) आणि सिडनी (३-६ जानेवारी २०२१) येथे होतील. मात्र, ऑस्ट्रेलियात लॉकडाऊन असल्याने अजून लायन आणि त्याच्या सहकार्‍यांना एकत्र सराव करता आलेला नाही. लॉकडाऊनच्या काळात तू कसा सराव करत आहेस असे विचारले असता लायन म्हणाला की, मी अजून पूर्णपणे गोलंदाजीला सुरुवात केलेली नाही. मी सध्या सिडनीतील युवा फिरकीपटूंना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यापैकीच एका फिरकीपटूसोबत मी तीन-चार आठवडे थोडीफार गोलंदाजी करत आहे.

फिरकीपटू गोलंदाजीची सुरुवात करतील…

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीच्या वापरावर आयसीसीने बंदी घातली आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यात अडचण येऊ शकेल असे म्हटले जात आहे. तसे झाल्यास बहुधा फिरकीपटूंना गोलंदाजीची सुरुवात करावी लागेल आणि हे पाहताना मजा येईल, असे नेथन लायन गमतीत म्हणाला. तसेच पुढील महिन्यात सुरू होणार्‍या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेवरही त्याची नजर असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -