घरक्रीडाIND vs ENG 3rd Test : रूटच्या शतकामुळे इंग्लंडची पकड मजबूत; दुसऱ्या...

IND vs ENG 3rd Test : रूटच्या शतकामुळे इंग्लंडची पकड मजबूत; दुसऱ्या दिवसअखेर त्रिशतकी आघाडी

Subscribe

कर्णधार रूटने मालिकेतील तिसरे शतक झळकावताना १२१ धावांची खेळी केली.

कर्णधार जो रूटसह अव्वल चार फलंदाजांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीवर इंग्लंडने आपली पकड मजबूत केली आहे. हेडिंग्ले येथे होत असलेल्या या सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांत आटोपला. याचे उत्तर देताना इंग्लंडची दुसऱ्या दिवसअखेर १२९ षटकांत ८ बाद ४२३ अशी धावसंख्या होती. त्यामुळे त्यांच्याकडे पहिल्या डावात ३४५ धावांची भक्कम आघाडी होती. कर्णधार रूटने मालिकेतील तिसरे शतक झळकावताना १६५ चेंडूत १४ चौकारांच्या मदतीने १२१ धावांची खेळी केली. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील २३ वे आणि भारताविरुद्ध कसोटीतील आठवे शतक ठरले. अखेर त्याला जसप्रीत बुमराहने बाद केले.

रूट-मलानची शतकी भागीदारी 

इंग्लंडची पहिल्या दिवसअखेर बिनबाद १२० अशी धावसंख्या होती. दुसऱ्या दिवशी पुढे खेळताना इंग्लंडचे सलामीवीर रोरी बर्न्स (६१) आणि हसीब हमीद (६८) बाद झाले. यानंतर मात्र कर्णधार रूट आणि डाविड मलान यांनी उत्कृष्ट फलंदाजी करताना १३९ धावांची भागीदारी रचली. तीन वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या मलानने १२८ चेंडूत ७० धावांची खेळी केल्यावर त्याला मोहम्मद सिराजने बाद केले. रूटने मात्र अप्रतिम फलंदाजी सुरु ठेवत मालिकेतील तिसरे शतक झळकावले.

- Advertisement -

शमीने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट 

रूटला मलाननंतर जॉनी बेअरस्टोची (२९) काहीशी साथ लाभली. त्यानंतर सॅम करन (१५) आणि क्रेग ओव्हर्टन (नाबाद २४) या तळाच्या फलंदाजांनी काही चांगले फटके मारत इंग्लंडला चारशे धावांचा टप्पा पार करून दिला. इंग्लंडची दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ४२३ अशी धावसंख्या होती. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन, तर सिराज आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.


हेही वाचा – कोहलीने प्रथम फलंदाजी घेऊन धोका पत्करला; माजी क्रिकेटपटूची टीका

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -