घरक्रीडाIND vs ENG : कर्णधार कोहलीच्या संघनिवडीवर नजर!

IND vs ENG : कर्णधार कोहलीच्या संघनिवडीवर नजर!

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून खेळला जाईल.

विराट कोहलीच्या कर्णधार म्हणून कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक चार महिन्यांना सुरुवात होत असून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून खेळला जाईल. कोहलीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पूर्वसंध्येलाच अंतिम ११ खेळाडूंची घोषणा केली होती. या संघात दोन फिरकीपटूंचा समावेश होता. परंतु, सामन्याच्या पहिल्या दिवस पाऊस पडल्याने दोन फिरकीपटूंसह खेळण्याचा निर्णय फसला. त्यामुळे कोहलीवरही टीका झाली. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीच्या संघनिवडीवर सर्वांची नजर असणार आहे.

चार वेगवान गोलंदाजांना संधी मिळणार?

नॉटिंगहॅमच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांना नेहमीच मदत मिळते. तसेच या कसोटी सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खेळपट्टीवर बरेच गवत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात चार वेगवान गोलंदाजांचा समावेश असण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमीचे संघातील स्थान जवळपास निश्चित आहे. परंतु, इतर तीन जागांसाठी जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांच्यात स्पर्धा आहे. बुमराहला मागील काही काळात कसोटीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. मात्र, असे असले तरी कोहली त्याला पहिल्या काही सामन्यांसाठी संघातून वगळण्याची शक्यता कमीच आहे. तसेच फिरकीपटू म्हणून अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

- Advertisement -

राहुल येणार सलामीला?

गोलंदाजीत भारताकडे बरेच पर्याय आहेत. परंतु, फलंदाजीत रोहित शर्मासोबत सलामीला कोणाला खेळवायचे हा कोहलीपुढे सर्वात मोठा प्रश्न आहे. शुभमन गिल पायाच्या दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार असून त्याच्या जागी निवड झालेला पृथ्वी शॉ पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. तसेच सोमवारी मयांक अगरवालच्या डोक्याला चेंडू लागल्याने तो पहिल्या कसोटीत खेळणार नाही. त्यामुळे सलामीवीर म्हणून आता भारताकडे रोहितसह अभिमन्यू ईश्वरन आणि लोकेश राहुल यांचा पर्याय आहे. भारताने इंग्लंडमधील मागील १४ पैकी ११ कसोटी सामने गमावले असले तरी यंदाच्या मालिकेत कोहलीच्या संघाचे पारडे जड मानले जात आहे. परंतु, कोहली आता संघात कोणत्या खेळाडूंची निवड करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

प्रतिस्पर्धी संघ (संभाव्य ११) –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

- Advertisement -

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), डॉम सिबले, रोरी बर्न्स, झॅक क्रॉली, डॅन लॉरेंस, ऑली पोप, जॉस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.

सामन्याची वेळ : दुपारी ३.३० पासून; थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -