घरक्रीडाटीम इंडिया विजयी; मालिकाही घातली खिशात

टीम इंडिया विजयी; मालिकाही घातली खिशात

Subscribe

सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी केलेली जबदस्त फटकेबाजीआणि शार्दुल ठाकुरच्या निर्णायक खेळीमुळे टीम इंडियाचा विजय झाला. या विजयासह भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या एकदिवसीय सामन्यांची मालिकाही भारतीय संघ विजयी झाला. रविवारी झालेला सामना दोन्ही संघांसाठी आव्हानात्मक होता. दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या जबरदस्त खेळीमुळे हा सामना अत्यंत रोचक बनला. मात्र, शेवटच्या वेळी शार्दुलच्या फटकेबाजीमुळे डाव भारताच्या बाजूला झुकला.

कटक येथे झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. या मालिकेत नाणेफेक जिंकण्याची भारताची पहिलीच वेळ होती. सलामीवीर एविन लुईस आणि शाई होप यांनी विंडीजच्या डावाची संयमाने सुरुवात केली. त्यामुळे पहिल्या १० षटकांनंतर त्यांची बिनबाद ४४ अशी धावसंख्या होती. या दोघांनी पुढेही चांगली फलंदाजी सुरु ठेवत १३ व्या षटकात विंडीजच्या ५० धावा फलकावर लावल्या. मात्र, १५ व्या षटकात रविंद्र जडेजाने लुईसला २१ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. पहिल्या सामन्यात शतक, तर दुसऱ्या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या होपचा ४२ धावांवर मोहम्मद शमीने त्रिफळा उडवला. यंदाच्या वर्षात शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहे. होपला बाद करत त्याने यंदाची ४२ वी विकेट मिळवली. यानंतर शिमरॉन हेटमायर (३३ चेंडूत ३७) आणि रॉस्टन चेस (४८ चेंडूत ३८) यांनी काही काळ चांगली फलंदाजी केली. मात्र, या दोघांनांही एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीने माघारी पाठवले. त्यामुळे विंडीजची ३२ व्या षटकात ४ बाद १४४ अशी अवस्था झाली.

- Advertisement -

मागील सामन्यातील अर्धशतकवीर निकोलस पूरन आणि कर्णधार किरॉन पोलार्ड यांनी विंडीजचा डाव सावरला. या दोघांनी सुरुवातीला सावध फलंदाजी केली. परंतु, खेळपट्टीवर काही वेळ घालवल्यानंतर त्यांनी आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली. पूरनने ४३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अधिकच फटकेबाजी केली. त्याच्यासोबतच पोलार्डने गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने ४४ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. पूरन शतक करणार असे वाटत असतानाच त्याला ८९ धावांवर शार्दूल ठाकूरने बाद केले. त्याने या धावा ६४ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केल्या. तसेच त्याने आणि पोलार्डने पाचव्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी रचली. तो बाद झाल्यानंतरही पोलार्डने फटकेबाजी सुरु ठेवली. तो डावाच्या अखेर ७४ धावांवर नाबाद राहिला. विंडीजने अखेरच्या १० षटकांत ११८ धावा फटकावल्या. त्यामुळे विंडीजने ५० षटकांत ५ बाद ३१५ अशी धावसंख्या उभारली.

याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी भारताच्या डावाची उत्कृष्ट सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली. रोहितने ५२, तर राहुलने ४९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, जेसन होल्डरने रोहितला (६३), तर अल्झारी जोसेफने राहुलला (७७) बाद केले. यानंतर श्रेयस अय्यर (७), रिषभ पंत (७) आणि केदार जाधव (९) झटपट माघारी परतले. कोहलीने मात्र एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावले. ४४ व्या षटकाच्या अखेरीस भारताची ५ बाद २७० अशी धावसंख्या होती. मात्र, त्यानंतर कोहली ८५ धावांवर बाद झाला. त्यानंतर शार्दुल ठाकुर मैदानावर आला. त्याने ६ चेंडूत नाबाद १७ धावा केल्या आणि टीम इंडियाला जिंकवून दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -