घरक्रीडाभारताचे यश की इंग्लंडचे अपयश?

भारताचे यश की इंग्लंडचे अपयश?

Subscribe

विराट कोहलीच्या भारताने इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ असे यश संपादन केले. पहिल्या कसोटी व्यतिरिक्त या मालिकेतील खेळपट्ट्या या फिरकीला अनुकूल होत्या. मात्र, खेळपट्ट्या आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यात इंग्लंडला अपयश आले. तसेच 'रोटेशन पॉलिसी'नुसार त्यांनी संघात सतत बदल केले. अश्विन (४ सामन्यांत ३२ विकेट) आणि अक्षर (३ सामन्यांत २७ विकेट) यांच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. इंग्लंडने या मालिकेत केवळ दोन वेळा २०० धावांचा टप्पा पार केला. त्यामुळे भारताने ही मालिका जिंकली, हे भारताचे यश होते की इंग्लंडचे अपयश?, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

भारत म्हणजे सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघ! घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाच्या वर्चस्वाला शह देणे जरा अवघडच आहे. हाच धडा नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडला मिळाला. विराट कोहलीच्या भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ असे यश संपादन करत जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. भारताला या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी ही मालिका किमान २-१ अशी जिंकणे गरजेचे होते. पहिला सामना गमावल्यानंतर भारताने दमदार पुनरागमन करत विजयाची हॅटट्रिक करताना ही मालिका सहजपणे जिंकली.

या मालिकेची सुरुवात झाली चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये. कोरोनामुळे भारतामध्ये जवळपास वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेट झाले नव्हते. मात्र, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा क्रिकेटला सुरुवात झाली. भारतीय संघाने या मालिकेपूर्वीच काही दिवस ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करत कसोटी मालिका (तेही सलग दुसऱ्यांदा) जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यातच आता सामने घरच्या मैदानावर होणार असल्याने इंग्लंडविरुद्ध भारताचे पारडे जड मानले जात होते.

- Advertisement -

पहिल्या कसोटीत मात्र भारताला चांगला खेळ करण्यात अपयश आले. या सामन्यात अगदी पहिल्या दिवसापासून इंग्लंडचे वर्चस्व राहिले. इंग्लंडने पहिल्या डावातच ५७८ धावांची मजल मारली ती कर्णधार जो रूटच्या द्विशतकामुळे. रूटने तब्बल ९ तास किल्ला लढवत ३७७ चेंडूत २१८ धावांची खेळी केली. हे इंग्लंडचे या मालिकेतील एकमेव शतक ठरले. भारताचा पहिला डाव ३३७ धावांत आटोपल्याने इंग्लंडला द्विशतकी आघाडी मिळाली. भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडला दुसऱ्या डावात केवळ १७८ धावांवर रोखले. मात्र, ही कसोटी जिंकण्यासाठी भारताला ४२० धावांचे अशक्यप्राय आव्हान मिळाले आणि याचा पाठलाग करताना भारताचा डाव १९२ धावांतच आटोपला. त्यामुळे इंग्लंडने हा सामना २२७ धावांनी जिंकत मालिकेत आघाडी मिळवली.

पुढील कसोटीही चेन्नईतच होणार असल्याने भारताला पुनरागमन करणे शक्य होणार का? असा प्रश्न उपस्थित केला गेला. मात्र, या सामन्यात डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. अश्विन आणि अक्षर या फिरकी जोडगोळीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. या कसोटीत फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारताचा डाव गडगडतोय असे वाटत असतानाच मुंबईकर सलामीवीर रोहित शर्माने १६१ धावांची उत्कृष्ट खेळी केली.

- Advertisement -

रोहित हा कसोटी क्रिकेटमध्ये कितपत यशस्वी ठरू शकतो, याबाबत नेहमीच शंका उपस्थित केली जाते. परंतु, रोहितने आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर आपले नाणे खणखणीत वाजवले. त्याने या मालिकेच्या चार सामन्यांत भारताकडून सर्वाधिक ३४५ धावा केल्या. तसेच दुसऱ्या कसोटीत शतक झळकावताना रोहितने सुरुवातीपासून इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. त्याच्यासोबत खेळताना अजिंक्य रहाणेचाही खेळ बहरला आणि त्याने या मालिकेतील त्याचे एकमेव अर्धशतक करताना ६७ धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतनेही अर्धशतक केल्याने भारताने पहिल्या डावात ३२९ धावांची मजल मारली.

इंग्लंडची फलंदाजी मात्र दोन्ही डावांमध्ये ढेपाळली. पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या अश्विनने फलंदाजीतही आपली उपयुक्तता सिद्ध करताना दुसऱ्या डावात १०६ धावांची खेळी केली. हे अश्विनचे पाचवे कसोटी शतक होते. त्याच्या या खेळीमुळे भारताने २८६ धावा करत इंग्लंडपुढे सामना जिंकण्यासाठी ४८२ धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडचा दुसरा डावही फिरकीपुढे गडगडला. त्यांना १६४ धावाच करता आल्याने भारताने हा सामना तब्बल ३१७ धावांनी जिंकत मालिकेत बरोबरी साधली.

या मालिकेतील अखेरचे दोन कसोटी सामने अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडले. तिसरा कसोटी सामना जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये, गुलाबी चेंडूने, प्रकाशझोतात (डे-नाईट) होणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. परंतु, ही उत्सुकता फार काळ टिकू शकली नाही. या सामन्याची खेळपट्टी फिरकीला अनुकूल होती. अगदी पहिल्या चेंडूपासून फिरकीपटूंना मदत मिळत होती. याचा फायदा अश्विन-अक्षर जोडीने घेतला.

इंग्लंडचे फलंदाज या कसोटीच्या दोन्ही डावांत सपशेल अपयशी ठरले. इंग्लंडने पहिल्या डावात जेमतेम ११२ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्यांना शंभरीही पार करता आली नाही. त्यामुळे भारताने हा सामना अवघ्या दीड दिवसांत १० विकेट राखून जिंकला. दुसऱ्या महायुध्दानंतरच्या काळात हा सर्वात कमी वेळात संपलेला कसोटी सामना ठरला. गुजरातच्या अक्षरने आपल्या घरच्या मैदानावर खेळताना ११ विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. त्याला सामन्यात ७ मोहरे टिपत अश्विनने उत्तम साथ दिली.

अश्विन-अक्षरची फिरकी चौथ्या कसोटीतही प्रभावी ठरली. इंग्लंडने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात काहीशी झुंज देत द्विशतकी मजल मारली. याचे उत्तर देताना भारतीय संघ अडचणीत असताना रिषभ पंत (१०१) आणि वॉशिंग्टन सुंदर (नाबाद ९६) या युवकांनी भारताचा डाव सावरला. मोक्याच्या क्षणी या दोघांनी केलेल्या महत्वाच्या खेळींमुळे भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवली. अश्विन-अक्षरने ५-५ विकेट घेतल्याने इंग्लंडचा दुसरा डाव १३५ धावांतच आटोपल्याने भारताने हा सामना एक डाव आणि २५ धावांनी जिंकत मालिकेत सरशी साधली.

या संपूर्ण मालिकेत रोहित आणि पंत वगळता भारताच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, इंग्लंडचा कर्णधार रूटच्या म्हणण्यानुसार, मोक्याच्या क्षणी भारताने इंग्लंडपेक्षा चांगला खेळ केला. हाच दोन संघांमधील प्रमुख फरक होता. पहिल्या कसोटी व्यतिरिक्त या मालिकेतील खेळपट्ट्या या फिरकीला अनुकूल होत्या. मात्र, खेळपट्ट्या आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यात इंग्लंडला अपयश आले. तसेच ‘रोटेशन पॉलिसी’नुसार त्यांनी संघात सतत बदल केले. तसेच अश्विन (४ सामन्यांत ३२ विकेट) आणि अक्षर (३ सामन्यांत २७ विकेट) यांच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. त्यामुळे भारताने ही मालिका जिंकली, हे भारताचे यश होते की इंग्लंडचे अपयश?, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -