IND vs ENG : दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताला धक्का; ‘हा’ मुंबईकर खेळाडू सामन्याला मुकणार

भारताला अतिरिक्त फलंदाजाची कमतरता भासणार नाही असा कर्णधार कोहलीला विश्वास आहे.

shardul thakur to miss second test
'हा' मुंबईकर खेळाडू दुसऱ्या कसोटीला मुकणार

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच भारताला धक्का बसला आहे. मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर पायाच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकणार असल्याची माहिती भारतीय संघ व्यवस्थापनाने बुधवारी (आज) दिली आहे. शार्दूलची दुखापत फार गंभीर नसून तो तिसऱ्या कसोटीपूर्वी फिट होण्याची शक्यता असल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील नॉटिंगहॅम येथे झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात शार्दूलने चांगली गोलंदाजी करताना दोन्ही डावांत दोन-दोन विकेट घेतल्या होत्या.

आम्हाला फलंदाजीची चिंता नाही

शार्दूल दुसऱ्या कसोटीत खेळणार नसला तरी भारताला अतिरिक्त फलंदाजाची कमतरता भासणार नाही असा कर्णधार कोहलीला विश्वास आहे. रविंद्र जाडेजाने पहिल्या कसोटीत चांगली खेळी केली होती. त्यामुळे दुसऱ्या कसोटीपूर्वी फलंदाज म्हणून त्याचा आत्मविश्वास वाढला असून आमची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. तसेच पहिल्या कसोटीत आमच्या तळाच्या फलंदाजांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. शार्दूलमध्ये धावा करण्याची नक्कीच क्षमता आहे. परंतु, आम्हाला फलंदाजीची फारशी चिंता नाही. पहिल्या कसोटीत मी, पुजारा आणि अजिंक्य रहाणेने फारशा धावा केल्या नाहीत. परंतु, आम्हाला आता कामगिरीत सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे, असे कोहली म्हणाला.

अश्विनचे होणार पुनरागमन? 

शार्दूलने नॉटिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत दोन डावांत मिळून चार विकेट घेतल्या होत्या. त्याने पहिल्या डावात जो रूट आणि दुसऱ्या डावात जॉस बटलर या इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले होते. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याची उणीव भारताला भासू शकेल. त्याच्या अनुपस्थितीत ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे संघात पुनरागमन होऊ शकेल. तसेच भारताने पुन्हा चार वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतल्यास उमेश यादव किंवा ईशांत शर्मा यांना संधी मिळू शकेल.