आयर्लंड ३८ धावांत ऑल-आऊट; इंग्लंड विजयी

इंग्लंड विजयी

क्रिस वोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील आयर्लंडचा १४३ धावांनी पराभव झाला. तिसर्‍या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांत आटोपल्यामुळे आयर्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १८२ धावांचे आव्हान मिळाले. मात्र, आयर्लंडचा डाव केवळ ३८ धावांत आटोपल्यामुळे त्यांचे पहिले कसोटी विजयाचे स्वप्न अधुरेच राहिले. ही कसोटी क्रिकेटमधील सातवी सर्वात कमी धावसंख्या होती.

या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव ८५ धावांत आटोपल्यानंतर आयर्लंडने २०७ धावा करून पहिल्या डावात १२२ धावांची आघाडी मिळवली. इंग्लंडने दुसर्‍या डावात जॅक लिच (९२) आणि जेसन रॉय (७२) यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळे ३०३ धावा करत आयर्लंडपुढे चौथ्या डावात १८२ धावांचे लक्ष्य ठेवले.

याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या जेम्स मकॉलम (११) या केवळ एका फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली, तर चार फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा डाव १६ व्या षटकात ३८ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून ब्रॉडने १९ धावांत ४, तर वोक्सने १७ धावांत ६ विकेट्स घेतल्या. नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला येत कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक झळकावणार्‍या लिचला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.