घरक्रीडाकोहलीला कोणी टक्कर देऊच शकत नाही!

कोहलीला कोणी टक्कर देऊच शकत नाही!

Subscribe

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अनेक खेळाडू त्याचे अनुकरण करतात. त्याने एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० या तिन्ही प्रकारांत खोर्‍याने धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा टप्पा पार केला होता. ही कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला त्याच्यात आणि इतर खेळाडूंमध्ये खूप तफावत आहे, असे विधान वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लाराने केले. मात्र, असे असले तरी विराट नाही, तर सचिन तेंडुलकर माझा सर्वात आवडता खेळाडू आहे असेही लारा म्हणाला.

विराट कोहली हा रन मशीन आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत त्याने केलेली कामगिरी पाहिली, तर त्याच्यात आणि इतर खेळाडूंमध्ये खूप तफावत आहे, हे लक्षात येईल. विराट हा उत्कृष्ट फलंदाज आहे. सध्या सुरु असलेल्या विश्वचषकात रोहित शर्माने चार शतके केली आहेत, जॉनी बेअरस्टोने चांगले प्रदर्शन केले आहे. मात्र, मला जेव्हा माझ्या संघासाठी एक फलंदाज निवडण्याची वेळ येईल, तेव्हा मी विराटचीच निवड करेन, मग ते टी-२०, टी-१०, एकदिवसीय वा कसोटी क्रिकेट. परंतु विराट हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज असला तरी अजूनही माझा सर्वात आवडता फलंदाज सचिन तेंडुलकरच आहे, असे लारा म्हणाला.

- Advertisement -

सध्या भारताचे फलंदाज परदेशातही चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना मिळत असलेल्या या यशाचे श्रेय सचिनलाच दिले पाहिजे, असे लाराला वाटते. याबाबत त्याने सांगितले, सचिनने या खेळावर जो प्रभाव पाडला आहे, तो फारच उल्लेखनीय आहे. ज्यावेळी भारतीय फलंदाज परदेशात चांगली कामगिरी करत नाहीत असे म्हटले जायचे, तेव्हा त्याने प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक खेळपट्टीवर धावा करून दाखवल्या. त्यामुळे इतर भारतीय फलंदाजांचा दृष्टिकोन बदलला. सध्या भारतीय फलंदाज जी चांगली कामगिरी करत आहेत, त्याचे श्रेय सचिनलाच द्यायला पाहिजे. ते सचिनचा खेळ पाहून खूप शिकले आहेत.

यंदाच्या विश्वचषकात वेस्ट इंडिजला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले आहे. या संघाचे मागील १०-१५ वर्षांतील प्रदर्शन अगदी साधारण आहे. याबाबत लारा म्हणाला, जुने-अनुभवी खेळाडू निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी युवा खेळाडू येतात. प्रत्येक संघ या परिस्थितून जातो. आमचा संघही गेल्या अनेक वर्षांपासून यातून जात आहे. मात्र, त्यांना यातून बाहेर पडण्यात अपयश येत आहे, हे दुर्दैव.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -