घरक्रीडामेस्सीचा यु-टर्न, पण... 

मेस्सीचा यु-टर्न, पण… 

Subscribe

काही दिवसांपूर्वीच मेस्सीने त्याला बार्सिलोना सोडायचे असल्याचे फॅक्स पाठवत क्लबच्या बोर्डाला कळवले. परंतु, बार्सिलोनाचे बोर्ड मेस्सीला सहजासहजी हा संघ सोडू देईल याची शक्यता कमीच होती आणि हेच झाले. बोर्डाने टाकलेल्या दबावामुळे मेस्सीला त्याचा क्लब सोडण्याचा निर्णय मागे घेणे भाग पडले. मेस्सीने आता यु-टर्न घेतला असला, तरी तो केवळ या मोसमापुरताच आहे हे विसरता कामा नये.             

जगभरात विविध खेळांत मोजकेच खेळाडू असे असतात, ज्यांच्यामुळे त्यांचा संघ ओळखला जातो. या काही खास खेळाडूंपैकीच एक म्हणजे विक्रमी सहा वेळा ‘बॅलन डी ओर’ पुरस्कार पटकावणारा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी. मेस्सी हे नाव उच्चारल्यावर फुटबॉल चाहत्यांच्या डोळ्यासमोर बार्सिलोना संघ येतो, बार्सिलोनाचे नाव घेतले तर लोकांना मेस्सी आठवतो. मेस्सी हा मूळचा अर्जेंटिनाचा. मात्र, बार्सिलोना या स्पॅनिश संघाने मेस्सीला आपलेसे केले आणि मेस्सीनेही या संघाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. तो संघाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वाधिक गोल करणारा खेळाडू झाला. त्यामुळे मेस्सी = बार्सिलोना, हे जणू समीकरणच झाले. मात्र, आगामी काळात हे समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत.

काही दिवसांपूर्वीच मेस्सीने त्याला बार्सिलोना सोडायचे असल्याचे फॅक्स पाठवत क्लबच्या बोर्डाला कळवले. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वच फुटबॉल चाहत्यांना धक्का बसला. दोन दशके बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करणारा मेस्सी याच क्लबकडून खेळत आपली कारकीर्द संपवेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु, बार्सिलोनाचे बोर्ड मेस्सीला सहजासहजी हा संघ सोडू देईल याची शक्यता कमीच होती आणि हेच झाले.

- Advertisement -

मेस्सीच्या करारातील एका कलमानुसार (क्लॉज) प्रत्येक मोसमाच्या अंती त्याला बार्सिलोनासोबत असलेला करार रद्द करण्याची परवानगी आहे. मात्र, हे कलम १० जूनला संपुष्टात आल्याचे बार्सिलोनाचे म्हणणे होते. मेस्सी स्पेन सोडून दुसऱ्या देशात गेल्यास ‘ला लिगा’ या स्पेनमधील प्रमुख स्थानिक स्पर्धेचे मोठे आर्थिक नुकसान होणार हे निश्चितच होते. त्यामुळे त्यांनीही बार्सिलोनाला समर्थन देत मेस्सीला करार रद्द करता येणार नाही असे सांगितले. त्यानंतर मेस्सीच्या वडिलांनी बार्सिलोनाच्या बोर्डाची भेट घेतली. मात्र, यातून काहीच निष्पन्न झाले नाही.

अखेर शुक्रवारी मेस्सी स्वतःच आपली बाजू मांडण्यासाठी माध्यमांपुढे आला आणि ‘गोल’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तो बेधडकपणे बोलला. ‘मला बार्सिलोना सोडायचे आहे, हे मी क्लबला, क्लबच्या अध्यक्षांना (जोसेप बार्तोमेयु) सांगितले. मी वर्षभर अध्यक्षांना हे सांगत होतो. मोसम संपल्यावर तू तुला हवा तो निर्णय घेण्यास मोकळा आहेस असे ते मला म्हणाले होते. परंतु, आता त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही. मला बार्सिलोनातच माझ्या कारकिर्दीचा शेवट करायचा होता. मात्र, या क्लबला आता कोणतीही दिशा नाही. त्यामुळे मला हा क्लब सोडायचा होता. माझे बार्सिलोनावर खूप प्रेम आहे. मला त्यांच्या विरोधात कोर्टात उभे राहायचे नाही आणि म्हणूनच मी पुढील मोसमात बार्सिलोनाकडूनच खेळणार आहे,’ असे मेस्सी म्हणाला.

- Advertisement -

बार्सिलोनाच्या बोर्डाने टाकलेल्या दबावामुळे मेस्सीला त्याचा क्लब सोडण्याचा निर्णय मागे घेणे भाग पडले. ‘या क्लबच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला देण्यात आलेली वागणूक योग्य आहे का? मेस्सीला स्वतःचा निर्णय घेण्याचा हक्क नाही का?,’ अशी चाहत्यांची प्रतिक्रिया येऊ लागली. मात्र, या मोसमानंतर मेस्सीचा बार्सिलोनासोबत असलेला करार संपुष्टात येणार असून तो पुन्हा या क्लबशी करारबद्ध होणे अवघडच आहे. परंतु, नक्की असे काय झाले की मेस्सीला बार्सिलोना क्लब सोडावासा वाटला?

मेस्सी आणि बार्सिलोना बोर्डाचे अध्यक्ष जोसेप बार्तोमेयु यांच्यातील संबंध फारसे चांगले नाहीत. बार्तोमेयु २०१४ मध्ये बार्सिलोनाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या अध्यक्षतेत बार्सिलोना संघ स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत राहिला. मात्र, हळूहळू त्यांची चॅम्पियन्स लीगमधील कामगिरी खालावत गेली. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत बार्सिलोनाची ‘ला मसिया’ ही अकादमी जगातील सर्वोत्तम मानली जायची. मात्र, बार्तोमेयु बार्सिलोनाचे अध्यक्ष झाल्यापासून या अकादमीचा दर्जा खालावला. त्यातच जावीसारखा खेळाडू निवृत्त झाला, तर इनिएस्टा, नेयमार, डॅनी आल्वेस यांसारख्या प्रमुख खेळाडूंना बार्सिलोना बोर्डाने दुसऱ्या संघात जाऊ दिले. या सगळ्यानंतरही बार्सिलोनाला यश मिळत राहिले, त्याचे एकमेव कारण म्हणजे मेस्सी.

बार्सिलोनाच्या बोर्डाला मेस्सीच्या भोवती चांगला संघ उभारता आला नाही. त्यामुळेच हळूहळू मेस्सी आणि बार्तोमेयु यांच्यातील संबंध बिघडत गेले. यावर्षाच्या सुरुवातीला बार्सिलोनाने प्रशिक्षक एर्नेस्टो वालवार्डे यांची त्यांच्या पदावरून हटवले. त्यानंतर ‘खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीचा भुर्दंड वालवार्डे यांना भरावा लागला,’ अशी टीका तेव्हाचे बार्सिलोनाचे संचालक एरीक अबिदाल यांनी केली. ही गोष्ट कर्णधार मेस्सी आणि बार्सिलोनाच्या इतर खेळाडूंना आवडली नाही. मेस्सीने सोशल मीडियावरून आपला राग व्यक्त केला. त्यानंतर कोरोनाच्या काळात बार्सिलोनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे हा क्लब खेळाडूंच्या वेतनात ७० टक्के कपात करण्याच्या विचारात होता. मात्र, यासाठी खेळाडू तयार नसल्याचे क्लबने माध्यमांना सांगितले. या गोष्टीवरून मेस्सी पुन्हा चिडला. अखेर खेळाडूंनी वेतनकपात स्वीकारली, पण मेस्सी आणि बार्सिलोनाचे बोर्ड यांच्यातील वाद आणखीच चिघळला.

मागील महिन्यात चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत बायर्न म्युनिककडून बार्सिलोनाचा ८-२ असा पराभव झाला. मेस्सी मोसमाच्या सुरुवातीपासूनच बार्सिलोना सोडण्याच्या तयारीत होता. या मानहानीकारक पराभवानंतर त्याचा निर्णय अधिकच पक्का झाला. त्याने आपला क्लब सोडण्याचा निर्णय बार्सिलोनाच्या बोर्डाला कळवला. मात्र, आता त्याला यु-टर्न घेणे भाग पडले आहे, पण त्याचा हा निर्णय केवळ या मोसमापुरताच आहे हे विसरता कामा नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -