युएफा युरोपा लीग : मँचेस्टर युनायटेड, इंटर मिलान संघांची आगेकूच

युनायटेड आणि इंटर या दोन्ही संघांना यंदाची स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

इंटर मिलानचा रोमेलू लुकाकू आणि मँचेस्टर युनायटेडचा ब्रुनो फर्नांडेस

अतिरिक्त वेळेत ब्रुनो फर्नांडेसच्या पेनल्टीमुळे मँचेस्टर युनायटेडने युएफा युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. २०१७ साली ही स्पर्धा जिंकणाऱ्या युनायटेडने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एफसी कोपेनहेगन संघावर १-० असा विजय मिळवला. तसेच इंटर मिलानलाही युरोपा लीग स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात यश आले. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत बायर लेव्हरकुसेनचा २-१ असा पराभव केला. युनायटेड आणि इंटर मिलान या दोन्ही संघांना यंदाची स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

कोपेनहेगनच्या गोलरक्षकाचा उत्कृष्ट खेळ

सोमवारी रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने एफ कोपेनहेगनवर १-० असा विजय मिळवला. कोरोनानंतर पुन्हा फुटबॉल सुरु झाल्यापासून युनायटेडचा संघ फॉर्मात आहे. त्यामुळे ते हा सामना जिंकतील अशी अनेकांना अपेक्षा होती. परंतु, कोपेनहेगन संघाने त्यांना या विजयासाठी चांगलेच झुंजवले. खासकरून कोपेनहेगनचा गोलरक्षक कार्ल-योहान योहान्सनने उत्कृष्ट खेळ करताना युनायटेडच्या खेळाडूंचे तब्बल १३ फटके परतवून लावले. पूर्वार्धात कोपेनहेगनला गोलच्या काही संधीही मिळाल्या, पण त्यांना या संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. उत्तरार्धात युनायटेडच्या खेळाडूंनाही गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे ९० मिनिटांचा नियमित सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. त्यानंतर झालेल्या ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत युनायटेडला पेनल्टी मिळाली, ज्याचे फर्नांडेसने गोलमध्ये रूपांतर करत युनायटेडला १-० असा विजय मिळवून दिला.

बारेला, लुकाकू यांचे गोल

दुसरीकडे इंटर मिलानने उपांत्यपूर्व फेरीत बायर लेव्हरकुसेनचा २-१ असा पराभव केला. इंटरकडून निकोलो बारेला आणि रोमेलू लुकाकू यांनी गोल केले. तर बायरचा एकमेव गोल काय हावर्ट्झने केला. हावर्ट्झचा हा बायरसाठी अखेरचा सामना ठरू शकेल. इंग्लिश संघ चेल्सी त्याला करारबद्ध करण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे.