घरक्रीडाविहारी, पुजाराने सावरले!

विहारी, पुजाराने सावरले!

Subscribe

न्यूझीलंड इलेव्हनविरुद्ध सराव सामन्यात भारत २६३

हनुमा विहारीचे झुंजार शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या ९३ धावांच्या खेळीमुळे न्यूझीलंड इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने २६३ धावांची मजल मारली. या दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे मयांक अगरवालसोबत सलामीवीराची भूमिका पार पाडण्यासाठी पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांच्यात स्पर्धा आहे. मात्र, सराव सामन्यात दोघांना खातेही उघडता आले नाही.

सेडन पार्कवर होत असलेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. वेगवान गोलंदाज स्कॉट कुगलायनने सलामीवीर शॉ आणि चौथ्या क्रमांकावरील गिल यांना उसळी घेणारे चेंडू टाकत बाद केले. कुगलायननेच मयांक अगरवालला एका धावेवर यष्टीरक्षक डेन क्लिवरकरवी झेलबाद केले. त्यामुळे भारताची ३ बाद ५ अशी अवस्था झाली. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ३० चेंडूत १८ धावा केल्यावर त्याला जिमी निशमने माघारी पाठवले.

- Advertisement -

यानंतर मात्र पुजारा आणि विहारी यांनी संयमाने फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असल्याने या दोघांनी कुगलायन आणि ब्लेअर टिकनरविरुद्ध सावध फलंदाजी केली. उपहारानंतर फलंदाजी करणे थोडे सोपे झाले. याचा विहारी आणि पुजाराने उत्तम फायदा घेत धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. पुजाराने लेगस्पिनर ईश सोधीच्या गोलंदाजीवर एक, तर विहारीने डावखुरा फिरकीपटू रचिन रविंद्रच्या गोलंदाजीवर तीन षटकार लगावले.

अखेर मध्यम गती गोलंदाज जॅक गिब्सनने पुजाराला ९३ धावांवर माघारी पाठवत ही जोडी फोडली. त्याने आणि विहारीने पाचव्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी रचली. विहारीने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत शतक झळकावले. तो पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर भारताचा डाव गडगडला. भारताने अखेरच्या ६ विकेट अवघ्या ३० धावांत गमावल्या. त्यामुळे त्यांचा पहिला डाव २६३ धावांवर आटोपला.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक – भारत : सर्वबाद २६३ (हनुमा विहारी १०१, चेतेश्वर पुजारा ९३, अजिंक्य रहाणे १८; स्कॉट कुगलायन ३/४०, ईश सोधी ३/७२) वि. न्यूझीलंड इलेव्हन.

सलामीवीर म्हणून खेळण्यास तयार – विहारी

हनुमा विहारीने मागील वर्षी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात सलामीवीराची भूमिका पार पाडली होती. आता रोहित शर्माच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडमध्येही सलामीवीर म्हणून खेळण्यास त्याची तयारी आहे. मी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार आहे. मला संघ व्यवस्थापनाने अजून सलामीवीर म्हणून खेळण्याबाबत विचारलेले नाही. मात्र, संघासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे, असे विहारी म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -