घरक्रीडामाहीच्या 'त्या' ग्लोव्ह्जवरून वर्ल्डकपमध्ये वाद!

माहीच्या ‘त्या’ ग्लोव्ह्जवरून वर्ल्डकपमध्ये वाद!

Subscribe

महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोव्ह्जवरून सुरु असलेला वाद आणि आयसीसी आणि बीसीसीआयमधल्या मतभेदांपर्यंत येऊन ठेपला आहे.

महेंद्रसिंह धोनी म्हटलं, की प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात अभिमानाची भावना निर्माण होत असेल. पण आपल्या नेतृत्वात भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा महेद्रसिंह धोनी आणि त्याचं विकेट किपिंग ग्लोव्ह्ज सध्या भलतंच चर्चेत आलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा वर्ल्डकप २०१९मधला पहिला सामना झाला. या सामन्यामध्ये माहीने हिरव्या रंगाचे ग्लोव्ह्ज घातले होते. या ग्लोव्ह्जवर ‘सॅक्रिफाईस’ अर्थात बलिदानचं चिन्ह आहे. यावरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आक्षेप घेतला आहे. ‘धोनीने हे ग्लोव्ह्ज घालू नयेत’, असं आयसीसीनं सांगितलं आहे. पण बीसीसीआयने मात्र धोनीला पाठिंबा देत ‘ग्लोव्ह्ज घालून त्याने काहीही चुकीचं केलेलं नाही’, अशी भूमिका घेतली आहे.

का आहे आयसीसीला आक्षेप?

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यादरम्यान धोनीने हिरव्या रंगाचे ग्लोव्ह्ज घातले होते. सुरुवातीला कुणाच्या हे फारसं लक्षात आलं नाही. नंतर मात्र त्याच्या ग्लोव्ह्जवर ‘सॅक्रिफाइस’ अर्थात ‘बलिदान’ असा बॅच असल्याचं लक्षात आलं. त्यावरून वाद सुरू झाला. या बॅचवर आणि पर्यायाने धोनीच्या ग्लोव्ह्जवर आयसीसीने आक्षेप घेत हे ग्लोव्ह्ज धोनी घालू शकत नाही असं नमूद केलं. आयसीसीच्या नियमांनुसार कोणताही खेळाडू सामन्यादरम्यान कोणताही राजकीय, धार्मिक, वांशिक किंवा लष्कराशी संबंधित संदेश देऊ शकत नाही किंवा तसे संदेश देणारे बॅच वापरू शकत नाही. या नियमाचा हवाला देत आयसीसीने धोनीच्या ग्लोव्ह्जवर आक्षेप नोंदवला आहे.

- Advertisement -

काय आहे सॅक्रिफाईस बॅच?

‘सॅक्रिफाइस’ अर्थात ‘बलिदान’ हा बॅच लष्कराच्या विशेष तुकड्यांना वापरण्यास परवानगी आहे. त्यातही फक्त पॅराशूट रेजिमेंटच्या जवानांनाच तो वापरता येतो. पॅराशूट रेजिमेंटचा समावेश असलेली अर्धसैनिकी तुकडी(पॅरामिलिटरी कमांडो) हे बॅच वापरू शकतात.

धोनीने का घातला तो बॅच?

दरम्यान, २०११मध्ये महेंद्रसिंह धोनीला पॅराशूट रेजिमेंटमध्ये मानद दर्जाची लेफ्टनंट पदवी बहाल करण्यात आली आहे. त्याशिवाय, २०१५मध्ये त्याने पॅरा ब्रिगेडचं प्रशिक्षण देखील घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने धोनीची पाठराखण केली आहे. ‘धोनीने घातलेल्या बॅचमधून कोणत्याही प्रकारे धार्मिक किंवा व्यावसायिक जाहिरात होत नाही. तो एक देशासाठी गर्वाचा भाग आहे. त्यामुळे यावर आयसीसीला आक्षेप असण्याची काहीच कारण नाही. त्यामुळे धोनीला तो बॅच वापरण्याची परवानगी मिळावी म्हणून आम्ही आयसीसीला याआधीच विनंती केली आहे’, अशी माहिती या मुद्द्यावर आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी बोलताना दिली.

- Advertisement -

सोशल मीडियावर माहीला पाठिंबा

दरम्यान, या वादानंतर सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनीला पाठिंबा देण्यासाठी ट्रेंडच सुरु झाला आहे. ट्विटर या सोशल मीडियावर #DhoniKeepTheGlove नावाचा ट्रेंड सुरू झाला आहे. या हॅशटॅगवरून धोनीचे असंख्य चाहते त्याला पाठिंबा देत आहेत. या पार्श्वभूमीवर आता आयसीसी काय निर्णय घेते, त्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. येत्या ९ जून रोजी भारताचा ऑस्ट्रेलियासोबत सामना होणार आहे. त्या सामन्यात धोनी हेच ग्लोव्ह्ज घालू शकेल की नाही, हे आयसीसीच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -