घरक्रीडाश्री स्वामी समर्थ मंडळ, वरळी स्पोर्ट्स तिसर्‍या फेरीत

श्री स्वामी समर्थ मंडळ, वरळी स्पोर्ट्स तिसर्‍या फेरीत

Subscribe

मुंबई शहर निवड चाचणी कबड्डी

श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळ, वरळी स्पोर्ट्स क्लब, मातृभूमी क्रीडा मंडळ, श्रीराम क्रीडा मंडळ, विहंग क्रीडा मंडळ, शिवाजी स्पोर्ट्स क्लब या संघांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरुष व्दितीय श्रेणी गटाची तिसरी फेरी गाठली. नायगावमधील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीतील सामन्यात श्री स्वामी समर्थने अटीतटीच्या लढतीत मध्यंतरातील १३-१७ अशी पिछाडी भरून काढत जय बजरंगवर ३८-२७ अशी बाजी मारली. विद्यासागर कोकितकर, प्रतिक जाधव यांनी जय बजरंगला विश्रांतीपर्यंत ४ गुणांची आघाडी मिळवून दिली होती. मात्र, मध्यंतरानंतर स्वामी समर्थच्या अतुल पाटील, भिलवाई सावंत यांनी आक्रमक खेळ करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

वरळी स्पोर्ट्सने सिद्धीविनायक क्रीडा मंडळाला ३८-३७ असे नमवत आगेकूच केली. आर्यन पांचाळ, साहिल तांडेल वरळी स्पोर्ट्सकडून, तर सतीश जाधव, अंकुश पवार सिद्धीविनायककडून उत्तम खेळले. मातृभूमी क्रीडा मंडळाने अमर प्रतिष्ठानचा ३८-३२ असा पराभव केला. या सामन्याच्या मध्यंतराला मातृभूमी क्रीडा मंडळ १३-२१ असे पिछाडीवर होते. मातृभूमीच्या राकेश तोडणकर, नारायण तोडणकर यांनी आक्रमक खेळ करत आपल्या संघाला तिसरी फेरी गाठून दिली.

- Advertisement -

श्रीराम क्रीडा मंडळाने ५-५ चढायांच्या डावात ओम ज्ञानदीप मंडळाला ३२-३० असे पराभूत केले. या सामन्याच्या मध्यंतराला ओम ज्ञानदीपकडे १५-१२ अशी आघाडी होती. यानंतर श्रीरामने चांगला खेळ करत नियमित सामन्याअखेरीस दोन्ही संघांमध्ये २६-२६ अशी बरोबरी होती. अखेर ५-५ चढायांच्या डावात श्रीरामने ६-४ अशी बाजी मारली. विनायक म्हात्रे, राजेश खोत श्रीरामकडून उत्कृष्ट खेळले.

विहंग क्रीडा मंडळाने चुरशीच्या सामन्यात श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळावर ३४-३३ असा विजय मिळवला. या सामन्याच्या मध्यंतराला विहंगचा संघ २२-१२ असा मोठ्या फरकाने पिछाडीवर होता. परंतु, उत्तरार्धात त्यांनी अप्रतिम खेळ करत हा सामना जिंकला. त्यांच्या कल्पेश धुमाळ, अंकुश पाटील यांनी आक्रमणात, तर चेतन भोईरने बचावात चांगला खेळ केला. शिवाजी स्पोर्ट्स क्लबने जयदत्त मंडळाचे आव्हान ३९-३४ असे मोडून काढले. यश पवार, देवेन पंदुरकर यांच्या झंझावाती खेळाने जयदत्तने विश्रांतीला ७ गुणांची आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यांचा खेळ खालावला आणि ते पराभूत झाले.

- Advertisement -

इतर निकाल (द्वितीय श्रेणी-दुसरी फेरी)

१) गोलफादेवी क्रीडा मंडळ विजयी वि. एकवीरामाता क्रीडा मंडळ (४३-३७), २) आकांक्षा क्रीडा मंडळ विजयी वि. दुर्गामाता सेवा मंडळ (३८-३०), ३) काळेवाडीचा विघ्नहर्ता विजयी वि. विजय नवनाथ (३४-१८), ४) गावदेवी क्रीडा मंडळ विजयी वि. भावकोमाता क्रीडा मंडळ (३४-३१), ५) ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट विजयी वि. बारादेवी क्रीडा मंडळ (२५-२४), ६) प्रॉमिस स्पोर्ट्स क्लब विजयी वि इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब (३१-२३).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -