घरक्रीडाध्येय पुनरागमनाचे!

ध्येय पुनरागमनाचे!

Subscribe

मुंबई-कर्नाटक रणजी सामना आजपासून

मुंबई आणि कर्नाटक या स्थानिक क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघांतील रणजी करंडकाच्या सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. हा सामना मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे होईल. रणजी करंडक सर्वाधिक वेळा जिंकणार्‍या संघांमध्ये मुंबईचा अव्वल (४१), तर कर्नाटकाचा दुसरा (८) क्रमांक लागतो. मात्र, मागील काही मोसमांत कर्नाटकाने मुंबईपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्यातच मुंबईला मागील सामन्यात रेल्वेने पराभूत केले होते. त्यामुळे कर्नाटकाविरुद्ध आपला सर्वोत्तम खेळ करत दमदार पुनरागमनाचे मुंबईचे ध्येय असेल.

मुंबईने बडोद्याचा ३०९ धावांनी धुव्वा उडवत यंदाच्या रणजी मोसमाची दिमाखात सुरुवात केली होती. मात्र, घरच्या मैदानावर झालेल्या दुसर्‍या सामन्यात रेल्वेने त्यांना पराभवाचा धक्का दिला. तिसर्‍या दिवशी चहापानाआधीच संपलेल्या या सामन्यात फलंदाजांनी निराशजनक कामगिरी केली. अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, कर्णधार सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड यांचा समावेश असलेल्या मुंबईला रेल्वेविरुद्ध दोन्ही डावांत २०० धावांचीही मजल मारता आली नाही. तर मुंबईचे गोलंदाजही निष्प्रभ ठरले. बडोद्याविरुद्ध द्विशतकी खेळी करणार्‍या सलामीवीर पृथ्वीला रेल्वेविरुद्ध दोन्ही डावांत मिळून केवळ ३५ धावा करता आल्या, तर अनुभवी रहाणेने ५ आणि ८ धावा केल्या. रहाणेचा हा यंदाच्या मोसमातील अखेरचा सामना असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकाविरुद्ध मोठी खेळी करण्याचे त्याचे लक्ष्य असेल. शार्दूल ठाकूरच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजीची भिस्त तुषार देशपांडेवर असेल.

- Advertisement -

दुसरीकडे कर्नाटकाने या मोसमाची सुरुवात तामिळनाडूवर मात करत केली. मात्र, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश यांच्याविरुद्ध कर्नाटकाचे सामने अनिर्णित राहिले. आता मुंबईविरुद्ध मोसमातील दुसरा विजय मिळवण्यास ते उत्सुक असतील. त्यांना या सामन्यात कसोटीपटू मयांक अगरवालविनाच खेळावे लागेल. बीसीसीआयने मयांक विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्यामुळे तो या सामन्याला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत कर्णधार करुण नायर, सलामीवीर देवदत्त पडिक्कल यांच्यावर कर्नाटकाच्या फलंदाजीची भिस्त आहे. तसेच अभिमन्यू मिथून, रोनित मोरे यांसारख्या गोलंदाजांसमोर धावा करणे मुंबईच्या फलंदाजांना सोपे जाणार नाही, हे नक्की.

प्रतिस्पर्धी संघ –

मुंबई : सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, सर्फराज खान, शुभम रांजणे, आकाश पारकर, सिद्धेश लाड, शम्स मुलानी, विनायक भोईर, शशांक अत्तारडे, रॉयस्टन डायस, तुषार देशपांडे, दीपक शेट्टी, एकनाथ केरकर.

- Advertisement -

कर्नाटक : करुण नायर (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, निश्चल, समर्थ, अभिषेक रेड्डी, शरथ (यष्टीरक्षक), रोहन कदम, श्रेयस गोपाळ, जगदीश सूचित, अभिमन्यू मिथून, कौशिक, प्रतीक जैन, रोनित मोरे, शरथ श्रीनिवास, प्रवीण दुबे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -