घरक्रीडान्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा

न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा

Subscribe

भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बिनसीडेड प्रणॉयने दुसर्‍या सीडेड इंडोनेशियाच्या टॉमी सुगीर्टोचा पराभव केला. भारताच्याच साई प्रणितला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. तसेच पुरुष दुहेरीत मनू अत्री-सुमीत रेड्डी यांचाही पराभव झाला.

पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत प्रणॉयने टॉमी सुगीर्टोचा अवघ्या ३७ मिनिटांत २१-१४, २१-१२ असा फडशा पाडला. आता उपांत्यपूर्व फेरीत त्याचा जपानच्या पाचव्या सीडेड कांटा त्सुनेयामाशी सामना होईल. जागतिक क्रमवारीत २६ व्या स्थानावर असलेल्या प्रणॉयची जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी असलेल्या सुगीर्टोशी पहिल्यांदाच गाठ पडली. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच प्रणॉयने अप्रतिम खेळ केला. त्याला पहिल्या गेममध्ये ७-३ अशी आघाडी होती. या सेटच्या मध्यंतराला त्याने आपली आघाडी ११-४ अशी वाढवली.

- Advertisement -

यानंतर त्याने सुगीर्टोला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही आणि पहिला गेम २१-१४ असा आपल्या खिशात घातला. दुसर्‍या गेमच्या सुरुवातीला मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली. या गेममध्ये सुगीर्टो ४-२ अशी आघाडी मिळवली होती. मात्र, प्रणॉयने यानंतर सलग ६ गुण मिळवत ८-४ अशी आघाडी मिळवली. यानंतर सुगीर्टो केवळ चारच गुण मिळवता आल्याने प्रणॉयने हा गेम २१-१२ असा मोठ्या फरकाने जिंकला.

दुसरीकडे साई प्रणितला चीनचा महान खेळाडू लिन डॅनने १२-२१, १२-२१ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. सातव्या सीडेड डॅनचा आता उपांत्यपूर्व फेरीत अव्वल सीडेड अँथनी सिनीसुका गिंटींगशी सामना होईल. पुरुष दुहेरीत भारताची जोडी मनू अत्री आणि सुमीत रेड्डीचा गोह व्ही शेम आणि टॅन वि कियोन्ग या मलेशियाच्या जोडीने रंगतदार सामन्यात १७-२१, १९-२१ असा पराभव केला. त्याआधी बुधवारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -