घरक्रीडाओडिशा सरकारकडून धावपटू द्युती चंदची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

ओडिशा सरकारकडून धावपटू द्युती चंदची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

Subscribe

द्युती सध्याच्या घडीला भारताच्या सर्वोत्तम महिला धावपटूंपैकी एक आहे. 

ओडिशा सरकारने भारताची आघाडीची धावपटू द्युती चंदची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. खेलरत्न हा भारतीय खेळांमधील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. ओडिशा सरकारने द्युतीसह एकूण सहा खेळाडूंची विविध राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी शिफारस केली आहे. ‘माझे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी पाठवल्याबद्दल मी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे आभार मानते. तुम्ही मला कायम शुभेच्छा द्याल हीच आशा,’ असे द्युतीने ट्विटरवर लिहिले. द्युती सध्याच्या घडीला भारताच्या सर्वोत्तम महिला धावपटूंपैकी एक आहे.

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची शक्यता

मागील आठवड्यात पतियाळा येथे झालेल्या इंडियन ग्रँड प्रिक्स ४ स्पर्धेतील १०० मीटर शर्यतीत द्युतीने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडताना ११.७ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. मात्र, ऑलिम्पिकसाठी पात्रतेच्या वेळेपासून ती ०.०२ सेकंदांनी चुकली. असे असले तरी जागतिक क्रमवारीनुसार ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

मागील वर्षी अर्जुन पुरस्काराने गौरव

२५ वर्षीय द्युतीने २०१८ एशियाड स्पर्धेत १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले होते. तिला मागील वर्षी अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. द्युतीप्रमाणेच भारताचा हॉकीपटू बिरेंद्र लाक्रा (अर्जुन पुरस्कार), हॉकी प्रशिक्षक कालू चरण चौधरी (द्रोणाचार्य पुरस्कार), माजी ऑलिम्पियन अनुराधा बिस्वाल (ध्यान चंद पुरस्कार) यांचीही ओडिशा सरकारने विविध पुरस्कारांसाठी शिफारस केली आहे.

अंकिता रैनाची शिफारस

एशियाड स्पर्धेतील कांस्यपदक विजेते टेनिसपटू अंकिता रैना आणि प्रजनेश गुणेश्वरनची अखिल भारतीय टेनिस संघटनेने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. तसेच बलराम सिंग आणि एन्रिको पिपेर्नो यांचे नाव ध्यान चंद पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे. २०१८ एशियाडमध्ये अंकिता रैना आणि गुणेश्वरन या दोघांनांही कांस्यपदक जिंकण्यात यश आले होते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -