घरक्रीडागाथा ओव्हलची

गाथा ओव्हलची

Subscribe

इंग्लंड हे क्रिकेटचे माहेरघर, लंडन ही केवळ ब्रिटनचीच राजधानी नव्हे तर क्रिकेटचीही राजधानी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. लॉर्ड्स, ओव्हल ही दोन महत्त्वाची स्टेडियम लंडनमध्ये असून, शतकाहून अधिक काळ लोटूनदेखील त्यांचे महत्त्व अबाधित आहे. लॉर्ड्सप्रमाणे ओव्हलही शंभरहून अधिक कसोटी सामन्यांचे साक्षीदार आहे. क्रिकेटची पंढरी असा लॉर्ड्सचा उल्लेख करण्यात येतो, परंतु इंग्लंडमधील पहिलावहिला कसोटी सामना ओव्हलवर ६ ते ८ सप्टेंबर १८८० दरम्यान खेळला गेला. ‘अ‍ॅशेस’ चा जन्मदेखील ओव्हलमुळेच झाला. २८, २९ ऑगस्ट १८८२ रोजी झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ७ धावांनी विजय मिळविला. इंग्लंडच्या पराभवाने व्यथित झालेल्या क्रिकेट शौकिनांनी ‘स्पोर्टींग टाइम्स’मध्ये इंग्लंड क्रिकेटला आंदरांजली वाहताना ‘बेल्स’ जाळून त्या एका रक्षापात्रात (अर्न) ठेवल्या. यालाच ‘अ‍ॅशेस’ असे म्हटले जाते. लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट म्युझियमध्ये ‘अ‍ॅशेस’ अर्न ठेवण्यात आला असून, क्रिकेट रसिक याचे छायाचित्र आवर्जून टिपतात. ‘ओव्हल’ कसोटीतील पराभवामुळे ‘अ‍ॅशेस’ची निर्मिती झाली अन् त्यांना मानाचे स्थान लाभले ते ‘लॉर्ड्स’वर!

सरे कौंटी क्रिकेट क्लबचे मुख्यालय आहे ओव्हल. लंडनमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ओव्हलची ख्याती सर्वदूर पसरली ती क्रिकेटमुळे. ओव्हलच्या मागे असलेली गॅसोलिन टाकी सर्वांचे लक्ष वेधून घेते. ओव्हल स्टेडियमसमोरच लंडन ट्युबचे ओव्हल स्टेशन आहे. वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान ओव्हलचा परिसर क्रिकेटमय झाला आहे. इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत सरेची कामगिरी लक्षणीय आहे. १९५० चे दशक सरे कौंटीचा भरभराटीचा तसेच बहारदार काळ. १९५२-५८ अशी सलग सात वर्षे इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत सरेचा संघ अजिंक्य होता. सध्या इंग्लंडचा माजी कर्णधार-यष्टीरक्षक अ‍ॅलेक स्टुअर्ट सरे कौंटीचे संचालकपद भूषवतो आहे. स्टुअर्ट पिता-पुत्र, जॉन एड्रिच, केन बॅरिंग्टन, बॉब विलिस, बेडसर बंधू, मार्क बुचर असे अनेक कसोटीपटू सरेचेच. ब्रिटनचे माजी पंतप्रधान जॉन मेजर यांना क्रिकेटमध्ये दिलचस्पी. क्रिकेटही ते बर्‍यापैकी खेळायचे. ब्रिटनचे पंतप्रधान असताना जॉन मेजर यांनी सरे कौंटी क्रिकेट क्लबचे अध्यक्षपद भूषविले. ते केवळ नामधारी अध्यक्ष नव्हते. क्रिकेटची माहिती हा त्यांचा आणखी एक पैलू! सरे कौंटीच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त ओव्हलवर ९ जुलै १९९५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सामान्यासाठी जॉन मेजर हजर होते. याप्रसंगी सरेच्या अनेक माजी नामवंत खेळाडूंनी व्हिंटेज कारमधून ओव्हलला फेरी मारली, परंतु मेजर यांनी मैदानात न उतरता ‘प्रेसिडेंट बॉक्स’ मधूनच सामना पाहणे पसंत केले!

- Advertisement -

‘ओव्हल’चे भारतीय क्रिकेटशी अतूट नाते आहे. १९-२४ ऑगस्ट १९७१ दरम्यान झालेल्या ओव्हल कसोटीत अजित वाडेकरच्या भारतीय संघाने अ‍ॅशेस विजेत्या रे इलिंगवर्थच्या इंग्लंडवर ४ विकेट्सने विजय मिळविला. इंग्लंडमधील भारताचा हा पहिला कसोटी विजय साजरा झाला तेव्हा मुंबई-महाराष्ट्रात गणरायाचे आगमन झाले होते. फटाके वाजवून, पेढे वाटून क्रिकेटप्रेमी मुंबईकरांनी सर्वत्र जल्लोष केला. विशेष म्हणजे या कसोटीदरम्यान ओव्हलवर हत्ती आणण्यात आला होता. गजराजाचे आगमन भारतासाठी शुभशुकून ठरला. चंद्रशेखरच्या घातक फिरकीने (३८ धावात ६ बळी) इंग्लंडचा डाव १०१ धावातच आटोपला. वाडेकर, सरदेसाई, विश्वनाथ, इंजिनियरच्या फटकेबाजीमुळे भारताने सामना जिंकून मालिकेतही सरशी साधली. ओव्हल कसोटीतील (१९७९) सुनिल गावस्करचे दमदार द्विशतक (२२१) संस्मरणीयच, पण भारताला विजयासाठी ९ धावा कमी पडल्यामुळे ओव्हल कसोटी अनिर्णितच राहिली.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंड – द. आफ्रिका या सलामीच्या लढतीनंतर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ९ जून रोजी रंगेल. या वर्ल्डकपमधील ५ सामने ओव्हलवर खेळले जातील. वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडला आतापर्यंत ५ वेळा लाभले असून, यंदाही वर्ल्डकपची अंतिम फेरी लॉर्ड्सवर १४ जुलै रोजी खेळली जाईल. २००४ सालच्या आयसीसी मिनीवर्ल्डकप (चॅम्पियन्स ट्रॉफी) स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान ओव्हललाच लाभला होता. ब्रायन लाराच्या विंडीजने यजमान इंग्लंडला हरवून चॅपियन्स ट्रॉफी जिंकल्यावर विंडीजच्या पाठिराख्यांनी ओव्हलच्या परिसरात बेधुंद नाच-गाणी गात केलेला जल्लोष अविस्मरणीय!

- Advertisement -

इंग्लंडमध्ये आशियाई देशातील लोक नोकरी-धंदा, पर्यटनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात दिसतात. खासकरून लंडनमध्ये वर्ल्डकपमुळे यंदाही अनेक भारतीय विविध स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने हजर राहतील. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची उत्सुकता सार्यांना असून, ९ जूनला ओव्हलवर महासागर उसळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -