दुसर्‍यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचे पाकचे लक्ष्य!

पाकिस्तान क्रिकेट संघ

आपल्या दिवशी कोणत्याही संघाचा पराभव करू शकतो, अशी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची ओळख आहे. अगदी पूर्वीपासूनच या संघात खूप प्रतिभावान खेळाडू होते. पण त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता. मात्र, हा संघ विश्वचषकात खेळताना वेगळ्याच जिद्दीने खेळताना दिसतो. १९७५ मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकात या संघाला विशेष कामगिरी करता आली नाही. मात्र, त्यानंतर या संघाने सलग तीन (१९७९, १९८३, १९८७) विश्वचषकांची उपांत्य फेरी गाठली, तर १९९२ मध्ये त्यांनी एक पाऊल पुढे टाकत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि या फेरीत इंग्लंडचा पराभव करत पहिल्यांदा विश्वचषकावर आपले कोरले.

त्यानंतरही त्यांनी आपली दमदार कामगिरी सुरु ठेवत विश्वचषकात दोन वेळा उपांत्यपूर्व फेरी, एकदा उपांत्य फेरी आणि एकदा अंतिम फेरी गाठली आहे. मागील (२०१५) विश्वचषकातही त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. त्या विश्वचषकानंतर या संघात बरेच चांगले युवा फलंदाज आले आहेत. त्यामुळे इंग्लंडमधील विश्वचषक जिंकण्यासाठी पाकिस्तानला प्रमुख दावेदार मानले जात नसले, तरी या संघाला नमवणे कोणत्याही संघाला सोपे जाणार नाही.

मागील विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केल्याने दुसर्‍यांदा विश्वविजेते होण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. त्यानंतर या संघात काही महत्त्वाचे बदल झाले आहे. तो विश्वचषक खेळलेले मिसबा-उल-हक, शाहिद आफ्रिदी, युनिस खान असे काही अनुभवी खेळाडू निवृत्त झाले असून त्यांची जागा फखर झमान, बाबर आझम, इमाम-उल-हक, हसन अली अशा युवा खेळाडूंनी घेतली आहे. या युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे पाकिस्तान संघाने मागील १-२ वर्षांत चांगले प्रदर्शन केले आहे.

२०१७ मध्ये इंग्लंडमध्येच झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा पाकिस्तानने जिंकली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी भारताचा पराभव केला होता. त्यामुळे दबावामध्ये चांगला खेळ करण्यात सक्षम असल्याचे या संघाने दाखवून दिले आहे. मात्र, या संघाचा सध्याचा फॉर्म फारसा चांगला नाही. त्यांना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांनी मागील दोन एकदिवसीय मालिकांमध्ये मिळून ९-० असे पराभूत केले आहे. त्यामुळे या विश्वचषकात यशस्वी होण्यासाठी त्यांना आपल्या सध्याच्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र, या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण असल्याने या संघाला हा विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी आहे.

जमेची बाजू – पाकिस्तानचा संघ हा पूर्वापार त्यांच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो, पण सध्याच्या संघाची फलंदाजी ही जमेची बाजू आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत या संघाने तीन वेळा ३०० धावांचा टप्पा पार केला होता. त्यामुळे या विश्वचषकात ते मोठ्या धावसंख्या उभारतील अशी अपेक्षा आहे. त्यांचे युवा फलंदाज फखर झमान, बाबर आझम आणि इमाम-उल-हक यांनी मागील काही काळात अप्रतिम प्रदर्शन केले आहे. हे तिघेही जागतिक क्रमवारीत अव्वल १५ फलंदाजांमध्ये आहेत. त्यांच्या साथीला मोहम्मद हाफिज, शोएब मलिक आणि सर्फराज अहमद हे अनुभवी फलंदाजही असणार आहेत.

कमकुवत बाजू – इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तीन वेळा ३०० धावांचा टप्पा पार करूनही पाकिस्तानने हे सामने गमावले, ते त्यांच्या गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे. त्यामुळे या मालिकेत खेळलेल्या जुनेद खान आणि फहीम अश्रफ या गोलंदाजांना विश्वचषकाच्या संघातून वगळण्यात आले आहे. आता त्यांच्या जागी निवड झालेले मोहम्मद आमिर आणि वहाब रियाझ हे अनुभवी गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे पाकिस्तानच्या चाहत्यांचे लक्ष असेल.

विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ : सर्फराज अहमद (कर्णधार), फखर झमान, इमाम-उल-हक, बाबर आझम, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, इमाद वसिम, शादाब खान, वहाब रियाझ, हसन अली, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, शाहिन शाह आफ्रिदी

(खेळाडूवर लक्ष) –
बाबर आझम [फलंदाज]
एकदिवसीय सामने : ६४
धावा : २७३९
सरासरी : ५१.६८
स्ट्राईक रेट : ८५.९७
सर्वोत्तम : १२५

विश्वविजेते – १ वेळा (१९९२)

१९९९ – १९९९चा क्रिकेट विश्वचषक इंग्लंडमध्ये झाला. मात्र, या स्पर्धेचे सामने इंग्लंडबरोबरच आयर्लंड, वेल्स, स्कॉटलंड आणि नेदरलँड्समध्येही झाले. या स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले होते आणि या संघांना दोन गटांत विभागण्यात आले होते. प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन संघांना सुपर सिक्स फेरीत प्रवेश मिळाला आणि या फेरीत सर्वाधिक सामने ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. भारतीय संघाला सुपर सिक्स फेरीत केवळ एकच सामना जिंकता आल्याने त्यांना उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडचा तर ऑस्ट्रेलियाने द.आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर शेन वॉर्नने घेतलेल्या ४ विकेटमुळे पाकिस्तानला अवघ्या १३२ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य २१व्या षटकात गाठत दुसर्‍यांदा विश्वचषक जिंकला.

२००३ – दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनियामध्ये झालेल्या २००३ क्रिकेट विश्वचषकात १४ संघांनी सहभाग घेतला होता. हे संघ २ गटांमध्ये विभागण्यात आले होते. नामिबिया या संघाची विश्वचषकात खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांना या स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही. ‘अ’ गटात समावेश असलेल्या भारताने ६ पैकी ५ साखळी सामने जिंकत या स्पर्धेच्या सुपर सिक्स फेरीत प्रवेश केला आणि या फेरीत त्यांनी ३ पैकी ३ सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत भारताने केनियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नाबाद १४० धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत २ विकेट गमावत ३५९ धावांचा डोंगर उभारला, ज्याचा पाठलाग करताना भारताचा डाव २३४ धावांवर आटोपल्याने ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकत सलग दुसर्‍यांदा आणि एकूण तिसर्‍यांदा विश्वचषक जिंकला.

(संकलन – अन्वय सावंत)