घरक्रीडाभारताविरुद्ध भारतात खेळणे सर्वात आव्हानात्मक -लबूशेन

भारताविरुद्ध भारतात खेळणे सर्वात आव्हानात्मक -लबूशेन

Subscribe

भारत हा सध्या जगातील सर्वोत्तम संघ असून परदेशी खेळाडूंसाठी भारताविरुद्ध भारतात खेळणे सर्वात मोठे आव्हान असते, असे मत ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लबूशेनने व्यक्त केले. लबूशेनसाठी मागील काही महिने फारच अविस्मरणीय ठरले आहेत. मागील वर्षी कसोटीत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर (११ सामन्यांत ११०४ धावा) होता. त्याने नवीन वर्षाची दमदार सुरुवात करताना न्यूझीलंडविरुद्ध तिसर्‍या कसोटीत २१५ आणि ५९ धावांची खेळी केली. मात्र, लबूशेनने आशियामध्ये अजून केवळ दोनच सामने खेळले आहेत. त्यामुळे तो आता आशियात आणि खासकरून भारतात चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ लवकरच भारतात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत लबूशेनला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकेल.

भारताविरुद्ध मालिका जिंकणे सोपे नाही. त्यांच्या संघात अप्रतिम फलंदाज आणि गोलंदाज आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध खेळणे आणि जिंकणे हे आव्हान असते. परंतु, खेळाडू म्हणून तुम्हाला सर्वोत्तम संघांविरुद्ध अवघड परिस्थितीत स्वतःला सिद्ध करायचे असते. माझ्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. भारत हा सध्या जगातील सर्वोत्तम संघ आहे. परदेशी खेळाडूंसाठी भारताविरुद्ध भारतात खेळणे हे सर्वात मोठे आव्हान असते, असे लबूशेन म्हणाला.

- Advertisement -

इतक्यातच कोहली, स्मिथशी तुलना नको!
मार्नस लबूशेनने मागील काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी केल्याने त्याची विराट कोहली, स्टिव्ह स्मिथ आणि केन विल्यमसनसारख्या उत्कृष्ट खेळाडूंसोबत तुलना होत आहे. मात्र, तो याकडे फारसे लक्ष देत नाही. लोक माझ्याबाबत चांगले बोलतात याचा आनंद आहे. मात्र, मी त्याकडे फारसे लक्ष देत नाही. विल्यमसन, कोहली, स्मिथ हे खेळाडू सहा-सात वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. त्यामुळे केवळ एका मोसमात चांगली कामगिरी केल्यानंतर माझी त्यांच्याशी तुलना होणे योग्य नाही, असे लबूशेनने स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -