प्रीमियर लीग : लिव्हरपूलची मँचेस्टर युनायटेडवर मात

लिव्हरपूल

लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमियर लीगमधील आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. वर्जिल वॅन डाईक आणि मोहम्मद सलाहच्या गोलच्या जोरावर लिव्हरपूलने मँचेस्टर युनायटेडवर २-० अशी मात केली. ३० वर्षांत पहिल्यांदा इंग्लंडमधील सर्वोच्च फुटबॉल स्पर्धा जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या लिव्हरपूलने यंदाच्या मोसमात उत्कृष्ट खेळ केला आहे. त्यांनी आतापर्यंत २२ पैकी २१ सामने जिंकले असून त्यांच्या खात्यात ६४ गुण आहेत. गुणतक्त्यात दुसर्‍या स्थानावर असलेल्या मँचेस्टर सिटी आणि लिव्हरपूलमध्ये तब्बल १६ गुणांचा फरक आहे. तसेच त्यांनी एक सामना खेळला आहे.

मँचेस्टर युनायटेडने फॉर्मात असेलल्या लिव्हरपूलला चांगली झुंज दिली. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. लिव्हरपूलने या सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना १४ व्या मिनिटाला मिळाला. ट्रेंट अलेक्झांडर-अर्नोल्डच्या कॉर्नर किकवर वर्जिल वॅन डाईक हेडर मारत गोल केला आणि लिव्हरपूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर २६ व्या मिनिटाला रॉबर्टो फार्मिंहोने लिव्हरपूलचा दुसरा गोल केला, पण त्याआधी वॅन डाईकने मँचेस्टर युनायटेडचा गोलरक्षक डेविड ड गेयाला अयोग्यरीत्या पाडल्याने हा गोल रद्द करण्यात आला. मात्र, मध्यंतराला लिव्हरपूलला आपली १-० अशी आघाडी कायम राखण्यात यश आले.

मध्यंतरानंतर लिव्हरपूलला गोलच्या दोन-तीन चांगल्या संधी मिळाल्या. मात्र, त्यांना याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. दुसरीकडे युनायटेडच्या अँथनी मार्शियालला गोलची संधी मिळाली, पण त्याला फटका गोलवर मारता आला नाही. अखेरच्या काही मिनिटांमध्ये युनायटेडने गोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, याचा फायदा लिव्हरपूललाच झाला. ९० मिनिटांनंतरच्या अतिरिक्त वेळेत मोहम्मद सलाहने गोल करत लिव्हरपूलला हा सामना २-० असा जिंकवून दिला.

लेस्टर सिटीचा पराभव

बर्नलीने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात लेस्टर सिटीला पराभवाचा धक्का दिला. या सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला हार्वी बार्न्सने गोल करत लेस्टरला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, उत्तरार्धात क्रिस वूड आणि अ‍ॅशली वेस्टवूड यांनी गोल केल्याने बर्नली सामना २-१ असा जिंकला. हा लेस्टरचा यंदाच्या मोसमातील सहावा पराभव होता. त्यामुळे २३ सामन्यांनंतर त्यांचे ४५ गुण असून ते गुणतक्त्यात तिसर्‍या स्थानी आहेत.