क्रिकेट संघटनेच्या वादामुळे रहाणे स्टेडियमबाहेरच ताटकळत !

ajinkya-rahane
अजिंक्य रहाणेचे उद्गार

राजस्थान क्रिकेट असोसिएशन (आरसीए) आणि राजस्थान राज्य क्रीडा परिषद (आरएसएससी) यांच्यातील वादामुळे आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला जवळपास अर्धा तास जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियम बाहेर उभे रहावे लागले. आरसीए आणि आरएसएससीमधील वादामुळे स्टेडियमला कुलूप होते.

रहाणेसह राजस्थान रॉयल्सचे काही खेळाडू सरावासाठी सवाई मानसिंग स्टेडियमवर आले होते. मात्र, स्टेडियमला कुलूप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर राजस्थान रॉयल्सच्या अधिकार्‍यांनी मध्यस्थी केल्यानंतर खेळाडूंना सराव करण्याची संधी मिळाली. हे स्टेडियम आरएसएससीच्या अंतर्गत येते. त्यामुळे येथे सामने खेळण्यासाठी आरसीएला पैसे भरावे लागतात.

आरसीए आणि आरएसएससी यांच्यात पैशांच्या मुद्यावरून सुरुवातीपासूनच वाद आहे. आयपीएलच्या वेळेला सर्व खर्च हा संबंधित संघाने करायचा असतो. त्याचबरोबर मोफत पासेससाठी आरएसएससी यांच्याकडून नेहमीच आमच्यावर दबाव आणण्यात येतो. राजस्थान रॉयल्सने अलीकडेच मैदानासाठी बराच खर्च केला होता. मग असे असताना हा प्रकार घडतो याचे आश्चर्य वाटते, असे राजस्थान रॉयल्सचा एक पदाधिकारी म्हणाला.