स्लेजिंगचा माझ्यावर परिणाम होत नाही!

चेतेश्वर पुजाराचे विधान
चेतेश्वर पुजाराचे विधान

कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात भरवशाचा फलंदाज कोण असे विचारले असता बहुतांश क्रिकेट समीक्षक आणि चाहते हे चेतेश्वर पुजाराचे नाव घेतात. पुजारा आपल्या शांत स्वभावासाठी आणि संयमी फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो खेळपट्टीवर काही काळ टिकला की त्याला बाद करणे भल्या-भल्या गोलंदाजांनाही अवघड जाते. कसोटी क्रिकेटमध्ये तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करणे हे कोणत्याही फलंदाजासाठी आव्हान असते. मात्र, पुजारा ही जबाबदारी चोख बजावतो. ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांच्या स्लेजिंगसाठी ओळखले जातात. तेसुद्धा पुजाराचे लक्ष विचलित करु शकले नाहीत. मागील वर्षी त्यांच्याविरुद्ध पुजाराने खोर्‍याने धावा केल्या. माझ्यावर स्लेजिंगचा परिणाम होत असे पुजाराने स्पष्ट केले आहे.

डावाच्या सुरुवातीला तुम्हाला स्लेजिंगचा सामना करावा लागतो. परंतु, फलंदाजाने खेळपट्टीवर थोडा वेळ घालवल्यानंतर गोलंदाज स्लेज करत नाहीत. त्यांचे केवळ फलंदाजाला बाद करण्याचे लक्ष्य असते. मात्र, त्यात त्यांना अपयश आल्यास ते पुन्हा स्लेजिंग सुरू करतात. ते फलंदाजाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. मलाही स्लेजिंगचा सामना करावा लागला आहे, पण मी प्रत्युत्तर देत नाही. माझ्यावर स्लेजिंगचा फारसा परिणाम होत नाही. माझ्यावर मोठी जबाबदारी असते. त्यामुळे मी शांत राहून लक्षपूर्वक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. स्लेज करून गोलंदाजांना फलंदाजाचे लक्ष विचलित करायचे असते आणि तुम्ही त्यांना उलटून उत्तर दिले, तर तुम्ही त्यांच्या जाळ्यात सापडलात म्हणून समजा. मलाही कधीतरी स्लेजिंग करणार्‍याला प्रत्युत्तर द्यावेसे वाटते. मात्र, मी केवळ स्वतःच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करतो, असे पुजारा म्हणाला.

सराव सर्वात महत्त्वाचा…

कोणत्याही मालिकेत यश मिळवण्यासाठी सराव आणि तयारी सर्वात महत्त्वाची असते, असे चेतेश्वर पुजाराला वाटते. पुजाराने मागील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कसोटी मालिकेच्या चार सामन्यांत सर्वाधिक ५२१ धावा केल्या होत्या. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. त्या मालिकेविषयी पुजारा म्हणाला की, मी त्या मालिकेसाठी खूप सराव केला होता. २०१४-१५ मध्ये मी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेलो होतो. त्यामुळे त्यांच्या काय योजना असतील याची मला कल्पना होती आणि त्यानुसार मागील वर्षी मी तयारी केली. ऑस्ट्रेलियन गोलंदाज कशाप्रकारचे चेंडू टाकून मला बाद करण्याचा प्रयत्न करतील हे मला ठाऊक होते. त्यामुळे मी योजना आखली आणि स्वतःमध्ये सुधारणा केली.