गतविजेत्या ज्युव्हेंटसची इंटर मिलानवर मात

‘सीरिया ए’ फुटबॉल स्पर्धा

गोंझालो हिग्वाइनने उत्तरार्धात केलेल्या गोलच्या जोरावर गतविजेत्या ज्युव्हेंटसने इटालियन फुटबॉल स्पर्धा ‘सीरिया ए’च्या सामन्यात दुसरा बलाढ्य संघ इंटर मिलानवर २-१ अशी मात केली. हा सामना सुरू होण्यापूर्वी इंटर मिलानचा संघ गुणतक्त्यात पहिल्या, तर ज्युव्हेंटसचा संघ दुसर्‍या स्थानावर होता. तसेच इंटरचे सध्याचे प्रशिक्षक अँटोनियो काँटे हे काही वर्षांपूर्वीपर्यंत ज्युव्हेंटसचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनात ज्युव्हेंटसने तीन वेळा ‘सीरिया ए’ स्पर्धा जिंकली होती. प्रशिक्षक होण्यापूर्वी ते ज्युव्हेंटसकडून १३ वर्षे खेळले होते. त्यामुळे या सामन्यात काँटे यांचा सध्याचा संघ, माजी संघाविरुद्ध कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते.

ज्युव्हेंटसने या सामन्याची आक्रमक सुरुवात केली. याचा फायदा त्यांना चौथ्याच मिनिटाला मिळाला. मिरेलाम पॅनिचच्या पासवर पावलो डिबालाने अप्रतिम फटका मारत गोल केला आणि ज्युव्हेंटसला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी त्यांना फारवेळ टिकवता आली नाही. निकोलो बरेल्लाने क्रॉस केलेला चेंडू पेनल्टी बॉक्समध्ये मॅटियस डी लिटच्या हाताला लागल्याने १८व्या मिनिटाला इंटरला पेनल्टी मिळाली. यावर लॉटारो मार्टिनेझने गोल करत इंटरला १-१ अशी बरोबरी करून दिली. काही मिनिटांनंतर मार्टिनेझला गोल करण्याची आणखी एक संधी मिळाली. परंतु, त्याने मारलेला फटका ज्युव्हेंटसचा गोलरक्षक शेझनीने अडवला. सामन्याच्या ४३ व्या मिनिटाला ज्युव्हेंटसचा स्टार खेळाडू क्रिस्तिआनो रोनाल्डोने गोल केला, पण त्याआधी त्याला पास देणारा डिबाला ऑफ-साईड असल्यामुळे हा गोल रद्द करण्यात आला. त्यामुळे मध्यंतराला १-१ अशी बरोबरी होती.

मध्यंतरानंतर दोन्ही संघांच्या बचाव फळीने उत्तम खेळ केला. त्यामुळे दोन्ही संघांना गोल करण्याचा फारशा संधी मिळाल्या नाहीत. ज्युव्हेंटसने संघात बदल करत हिग्वाइनला मैदानावर आणण्याचा निर्णय घेतला. त्याने सामन्याच्या ८० व्या मिनिटाला गोल करत ज्युव्हेंटसला आघाडी मिळवून दिली. यानंतर इंटरच्या वसिनोने मारलेला फटका गोलरक्षक शेझनीने अडवला. त्यामुळे ज्युव्हेंटसने हा सामना २-१ असा जिंकला. दुसरीकडे एएस रोमा आणि कालिअरी यांच्यातील सामना १-१ असा, तर नॅपोली आणि टोरिनो यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला.

ज्युव्हेंटस अव्वल स्थानी

इंटर मिलानविरुद्ध ज्युव्हेंटसने विजय मिळवला. हा त्यांचा सात सामन्यांतील सहावा विजय होता, तर त्यांचा एक सामना बरोबरीत संपला होता. त्यामुळे त्यांनी १९ गुणांसह ‘सीरिया ए’च्या गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली आहे. या मोसमात दमदार कामगिरी करणार्‍या इंटरचा हा पहिलाच पराभव होता. त्यामुळे ७ सामन्यांत १८ गुणांसह ते दुसर्‍या स्थानावर आहेत. तिसर्‍या स्थानावर असलेल्या अटलांटाचे ७ सामन्यांत १६ गुण आहेत.