घरक्रीडाभारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये इतकी सुधारणा अपेक्षित नव्हती!

भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये इतकी सुधारणा अपेक्षित नव्हती!

Subscribe

वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज आणि आताचे क्रिकेट समालोचक इयन बिशप यांनी भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी मागील काही वर्षांत भारत आणि परदेशातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव या तेज त्रिकुटाने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताची ही वेगवान गोलंदाजांची फळी सध्या जगातील सर्वोत्तम म्हणून ओळखली जाते. भारताच्या गोलंदाजांमध्ये सुरुवातीपासूनच प्रतिभा होती, पण त्यांच्या खेळात इतकी सुधारणा होईल असे वाटले नव्हते, असे बिशप एका मुलाखतीत म्हणाले.

वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत ४० पैकी ३३ विकेट्स भारताच्या वेगवान गोलंदाजांनी मिळवल्या. आमच्या (विंडीज) गोलंदाजांनी काही दशकांपूर्वी भारताच्या फलंदाजांना सतावले होते, पण आता त्याच संघाचे गोलंदाज आमच्याविरुद्ध इतकी दमदार कामगिरी करतील असे वाटले नव्हते. त्यांच्या या यशाचे श्रेय गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराला जाते. भारताच्या गोलंदाजांमध्ये सुरुवातीपासूनच प्रतिभा होती. मात्र, त्यांच्या खेळात इतकी सुधारणा होईल हे अपेक्षित नव्हते, असे बिशप यांनी नमूद केले.

- Advertisement -

तसेच त्यांनी पुढे सांगितले, भारतीय गोलंदाजांना हे यश अचानक मिळालेले नाही. भारतातील वेगवान गोलंदाजीचा पाया कपिल देव आणि त्यानंतर जवागल श्रीनाथ, झहीर खान, मुनाफ पटेल, श्रीसंत यांसारख्या गोलंदाजांनी रचला. आताच्या भारतीय कर्णधाराला वेगवान गोलंदाज आवडतात आणि तो त्यांना पाठिंबा देत आहे. तसेच भारताला आता जसप्रीत बुमराहच्या रूपात एक अद्वितीय गोलंदाज मिळाला आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. शमी आणि इशांतने आपल्या खेळात खूप सुधारणा केली आहे. या गोलंदाजांत कोणत्याही खेळपट्टीवर यशस्वी होण्याची क्षमता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -