फिरकीपटूंची कामगिरी अफलातून

मुंबईचा कर्णधार रोहितने केली स्तुती

rohit sharma
रोहित शर्माचे उद्गार

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने फिरोझ शाह कोटला येथे झालेल्या आयपीएलच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ४० धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला २० षटकांत १२८ धावाच करता आल्या. या सामन्यात मुंबईचे फिरकीपटू राहुल चहर, जयंत यादव आणि कृणाल पांड्या यांनी चांगली गोलंदाजी केली. खासकरून राहुल चहरची कामगिरी उल्लेखनीय होती. त्याने शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर या दिल्लीच्या मुख्य फलंदाजांना माघारी पाठवले. त्यामुळे या सामन्यानंतर कर्णधार रोहितने मुंबईच्या फिरकीपटूंची स्तुती केली.

फलंदाजीत पहिल्या २ षटकांनंतर मला आणि क्विंटन डी कॉकला या खेळपट्टीवर १४० इतकी धावसंख्या केली तर आम्ही प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत टाकू शकू असे वाटले. आम्ही सुरुवातीला विकेट गमावल्या नाहीत, याचा फायदा आम्हाला अखेरच्या षटकांत मिळाला. आम्हाला माहित होते की फिरकीपटूंना या खेळपट्टीवर खेळणे सोपे नसेल आणि तसेच झाले. आमच्या फिरकीपटूंनी खूप चांगली गोलंदाजी केली. खासकरून राहुल चहरची कामगिरी खूपच अप्रतिम होती. तो मागील वर्षीही आमच्या संघात होता. मात्र, मयांक मार्कंडने चांगले प्रदर्शन केल्यामुळे त्याला संधी मिळाली नाही. यावर्षी त्याला आम्ही संधी देण्याचा निर्णय घेतला आणि त्याने या संधीचे सोने केले. तो खूपच चलाखीने गोलंदाजी करतो, असे रोहित म्हणाला.

दिल्लीविरुद्धचा सामना जिंकल्यामुळे मुंबईचे ९ सामन्यांत ६ विजय झाले आहेत. त्यामुळे गुणतक्त्यात मुंबईचा संघ दुसर्‍या स्थानी पोहोचला आहे. तर दिल्लीचा संघ या पराभवामुळे तिसर्‍या स्थानी घसरला आहे. त्यांनी ९ पैकी ५ सामने जिंकले आहेत.