घरक्रीडास्पॉट-फिक्सिंग प्रकरणाने केला आमिरचा घात -आर्थर

स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाने केला आमिरचा घात -आर्थर

Subscribe

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २७ वर्षीय आमिरने मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि चाहते यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांना मात्र आमिर कसोटीतून निवृत्त झाल्याचे आश्चर्य वाटले नाही. २०१० सालच्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाने त्याचा घात केला, असे आर्थर यांना वाटते. २०१० साली इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यातील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे आमिरवर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली. त्यानंतर २०१५ मध्ये त्याच्यावरील बंदीचा कालावधी संपल्यावर त्याचे पाकिस्तानी संघात पुनरागमन झाले. त्याने नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात दमदार कामगिरी केली. मात्र, कसोटीतून तो निवृत्त झाला.

आमिरच्या निवृत्तीबाबत आर्थर एका मुलाखतीत म्हणाले, आमिर पाच वर्षे (२०१०-२०१५) क्रिकेट खेळला नव्हता. कसोटी क्रिकेटमुळे खेळाडूंच्या शरीरावर ताण येतो आणि आमिरने पाच वर्षे काहीही क्रिकेट न खेळल्यामुळे त्याची शारीरिक क्षमता कमी झाली होती. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये आम्ही त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली, कारण तो एक अप्रतिम गोलंदाज आहे, जो परदेशात दमदार कामगिरी करू शकतो असे आमचे मत होते. आम्ही आमिरसाठी जे शक्य होते, ते केले. त्याने ‘त्या’ पाच वर्षांत योग्य काळजी घेतली नाही आणि हे तो स्वतःसुद्धा मान्य करेल. मात्र, त्याच्यासाठी तो काळ खूप कठीण होता हे मला ठाऊक आहे.

- Advertisement -

मला आमिर हा खेळाडू आणि माणूस म्हणून आवडतो. तो यापुढे कसोटी क्रिकेट खेळणार नाही याचे नक्कीच दुःख आहे, पण मला त्याच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही. त्याला आता फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आमिर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये मॅचविनर आहे, जो दबावाच्या परिस्थितीतही चांगला खेळ करू शकतो. पुढील वर्षी टी-२० विश्वचषकही होणार आहे. त्यामुळे यापुढील १८ महिन्यांत तो आमच्या संघासाठी खूप महत्त्वाचा गोलंदाज असणार आहे.

‘तो’ निर्णय खूप विचार करूनच!

कसोटी क्रिकेटमध्ये ३६ सामन्यांत ११९ बळी मिळवणार्‍या मोहम्मद आमिरने निवृत्तीचा निर्णय खूप विचार करून घेतला असे मिकी आर्थर यांनी सांगितले. आमिर कसोटीतून निवृत्त होण्याबाबत बर्‍याच काळापासून विचार करत होता. त्याने याबाबत माझ्याशी चर्चा केली होती. कसोटी क्रिकेटमुळे त्याच्या शरीरावर प्रचंड ताण येत होता. त्यामुळे त्याची कसोटी क्रिकेट न खेळण्याची इच्छा आणि त्याच्या शरीरावर येणारा ताण याचा विचार करून मला त्याचा निवृत्तीचा निर्णय मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -