घरक्रीडाTokyo Olympics : सलग दुसऱ्या विजयासह सिंधूची उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक

Tokyo Olympics : सलग दुसऱ्या विजयासह सिंधूची उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक

Subscribe

सिंधूचा उप-उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डशी सामना होईल.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये मंगळवारचा दिवस भारतासाठी निराशा करणारा ठरला होता. भारतीय पुरुष हॉकी संघ आणि बॉक्सिंगमध्ये लोव्हलिना बोर्गोहेनने विजयासह ऑलिम्पिकमधील आव्हान कायम राखले. परंतु, इतर खेळांमध्ये भारताचे खेळाडू स्पर्धेबाहेर झाले. बुधवारच्या दिवसाची सुरुवात मात्र भारतासाठी चांगली झाली आहे. भारताची विश्वविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. महिला एकेरीतील दुसऱ्या साखळी सामन्यात सिंधूने हॉंगकॉंगच्या चेउन्ग एनगनचा सरळ गेममध्ये पराभव केला. २०१६ रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या सिंधूला यंदा सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानले जात असून सलग दुसऱ्या विजयासह तिला स्पर्धेत आगेकूच करण्यात यश आले आहे.

चेउन्गविरुद्ध सलग सहावा विजय 

सिंधूने महिला एकेरीतील दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत ३४ व्या स्थानी असणाऱ्या चेउन्गचा २१-९, २१-१६ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासून आघाडी मिळवण्यास सुरुवात केली. पहिल्या गेमच्या मध्यंतराला तिच्याकडे ११-५ अशी मोठी आघाडी होती. यानंतरही सिंधूने चेउन्गला पुनरागमनाची संधी दिली नाही आणि पहिला गेम २१-९ अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र चेउन्गने खेळात सुधारणा केली. तिने आक्रमक खेळ करत सिंधूवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तिला फारसे यश आले नाही. सिंधूने अखेर हा गेम २१-१६ असा जिंकत सामनाही जिंकला. सिंधू व चेउन्ग यांच्यातील हा सहावा सामना होता. यापैकी प्रत्येक सामन्यात सिंधूनेच बाजी मारली आहे.

- Advertisement -

ब्लिचफेल्डशी होणार सामना 

सिंधूचा आता उप-उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डशी सामना होईल. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असणारी सिंधू आणि जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानी असलेली ब्लिचफेल्ड यांच्यात आतापर्यंत पाच सामने झाले आहेत. यापैकी चार सामने सिंधूने जिंकले असून केवळ एक सामना गमावला आहे. सिंधूने यंदाच्या स्पर्धेत दमदार कामगिरी केली असून चेउन्गच्या आधी पहिल्या सामन्यात तिने इस्राईलच्या कसेनिआ पोलिकार्पोव्हाला पराभूत केले होते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -