घरक्रीडाTokyo Olympics : रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूला मिळणार सुवर्ण? चिनी खेळाडू अडचणीत...

Tokyo Olympics : रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूला मिळणार सुवर्ण? चिनी खेळाडू अडचणीत येण्याची शक्यता

Subscribe

वेटलिफ्टर मीराबाईने रौप्यपदक जिंकत भारताचे पदकांचे खाते उघडून दिले होते.

टोकियो ऑलिम्पिकचा पहिला दिवस भारतासाठी अविस्मरणीय ठरला होता. वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकत भारताचे पदकांचे खाते उघडून दिले होते. हे भारताचे यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धांतील आतापर्यंतचे एकमेव पदक आहे. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये ८७ किलो, तर क्लीन आणि जर्कमध्ये ११५ किलो असे एकूण २०२ किलोचे वजन उचलत रौप्यपदक जिंकले होते. मात्र, आता तिच्या या रौप्यपदकाचे रूपांतर सुवर्णपदकात होऊ शकेल. याचे कारण म्हणजे, या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या चीनच्या होऊ झीहोईची उत्तेजक द्रव्य चाचणी (डोपिंग टेस्ट) होणार आहे. यात ती दोषी आढळल्यास तिचे पदक काढून घेतले जाईल आणि मीराबाई सुवर्णपदकाची मानकरी ठरेल.

ऑलिम्पिक विक्रमही प्रस्थापित केला होता

‘होऊ झीहोईला टोकियोत थांबण्यास सांगण्यात आले आहे. तिची उत्तेजक द्रव्य चाचणी (डोपिंग टेस्ट) होणार आहे,’ असे एएनआय वृत्तसंस्थेला सूत्रांकडून सांगण्यात आले. होऊ झीहोईने स्नॅचमध्ये ९४ किलो, तर क्लीन आणि जर्कमध्ये ११६ किलो असे एकूण २१० किलोचे वजन उचलत सुवर्णपदक पटकावले होते. या कामगिरीसह तिने ऑलिम्पिक विक्रमही प्रस्थापित केला होता. परंतु, आता ती अडचणीत सापडू शकेल.

- Advertisement -

मीराबाईने एकूण २०२ किलोचे वजन उचलत रौप्यपदक जिंकले. कर्णम मल्लेश्वरीनंतर (२००० सिडनी) ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मीराबाई ही भारताची दुसरी वेटलिफ्टर होती. ‘ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. मी हे पदक माझ्या देशाला समर्पित करते. सर्व भारतीयांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते,’ असे मीराबाई रौप्यपदक जिंकल्यानंतर म्हणाली होती.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -