घरक्रीडायुएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धा

युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धा

Subscribe

व्यायवसायिक फुटबॉलमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी युएफा चॅम्पियन्स लीग आपल्या ऐतिहासिक सामन्यांसाठी लोकप्रिय आहे. असाच एक सामना लिव्हरपूल आणि बार्सिलोना या दोन बलाढ्य संघात मंगळवारी रात्री झाला. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिला लेग बार्सिलोनाने आपल्या घरच्या मैदानावर ३-० असा जिंकला होता.

मात्र, लिव्हरपूलने ऐतिहासिक पुनरागमन करत दुसर्‍या लेगमध्ये बार्सिलोनाचा ४-० असा धुव्वा उडवत सलग दुसर्‍या वर्षी चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठली. त्यांनी ही लढत एकूण ४-३ या गोलसंख्येने जिंकली. दुसर्‍या लेगमध्ये लिव्हरपूलकडून डीवॉक ओरीगी आणि जिनी वाईनाल्डम यांनी प्रत्येकी २-२ गोल केले. बार्सिलोनाचे स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आणि लुईस सुआरेझ यांना चांगला खेळ करता आला नाही.

- Advertisement -

पहिला लेग ०-३ असा गमावणार्‍या लिव्हरपूलला दुसर्‍या लेगमध्ये मो सलाह आणि रॉबर्टो फर्मिंनो या महत्त्वाच्या खेळाडूंविनाच खेळावे लागले. मात्र, असे असतानाही त्यांनी दुसर्‍या लेगमध्ये जिद्दीने खेळ केला. या सामन्याची लिव्हरपूलने आक्रमक सुरुवात करत सातव्या मिनिटाला डीवॉक ओरीगीने केलेल्या गोलमुळे त्यांना १-० अशी आघाडी मिळाली. यानंतर बार्सिलोनाकडून लिओनेल मेस्सीला तर लिव्हरपूलकडून आंद्रे रॉबर्टसनला गोल करण्याची संधी मिळाली. मात्र, त्यांना गोल करण्यात अपयश आल्याने मध्यंतराला लिव्हरपूलची १-० आघाडीच कायम राहिली.

हा सामना किमान अतिरिक्त वेळेत नेण्यासाठी लिव्हरपूलला २ गोलची गरज असल्याने लिव्हरपूलने उत्तरार्धात अधिकच आक्रमक खेळ केला. रॉबर्टसनला दुखपतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले. त्याच्या जागी लिव्हरपूलच्या प्रशिक्षकांनी जिनी वाईनाल्डमला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आणि वाईनाल्डमनेही आपली छाप पाडण्यासाठी फार वेळ लावला नाही. त्याने ५४ व्या मिनिटाला गोल करत लिव्हरपूलला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

- Advertisement -

तर, २ मिनिटांनंतर शकिरीच्या क्रॉसवर वाईनाल्डमनेच हेडर मारत लिव्हरपूलचा तिसरा गोल केला. यानंतरही लिव्हरपूलने बार्सिलोनाच्या बचाव फळीवर दबाव कायम ठेवला. त्यामुळे या सामन्याच्या ७९ व्या मिनिटाला कॉर्नर किक मिळाली. यावर बार्सिलोनाच्या खेळाडूंचे लक्ष नसताना लिव्हरपूलच्या ट्रेंट अ‍ॅलेक्सझॅन्दर-आर्नोल्डने हुशारीने ओरीगीला पास दिला आणि ओरीगीने या संधीचे गोलमध्ये रूपांतर करत लिव्हरपूलला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बार्सिलोनाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना गोल करता न आल्याने लिव्हरपूलने हा सामना ४-० असा जिंकत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेचा अंतिम सामना १ जूनला माद्रिदमध्ये होणार आहे.

आम्ही शाळकरी मुलांप्रमाणे खेळलो – सुआरेझ

या सामन्यात आम्ही ज्याप्रकारे खेळलो, त्यामुळे आमच्यावर खूप टीका होणार आहे आणि त्यासाठी आम्ही तयार असायला हवे. आम्ही खूप दुःखी आहोत. आम्ही व्यावसायिक खेळाडू असलो तरी याप्रकारचा पराभव स्वीकारणे फार अवघड आहे. खासकरून लिव्हरपूलने जो चौथा गोल केला, त्यावेळी आम्ही अक्षरशः शाळकरी मुलांप्रमाणे खेळलो, असे सामन्यानंतर लिव्हरपूलचा खेळाडू लुईस सुआरेझ म्हणाला.

१ – १९९२ साली सुरु झालेल्या युएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीतील पहिला लेग ३ किंवा त्यापेक्षा अधिक गोलने गमावूनही अंतिम फेरी गाठणारा लिव्हरपूल हा या स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ आहे. त्याआधी युरोपियन कप म्हणून ही स्पर्धा खेळवली जायची. त्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिला लेग ३ गोलने गमावूनही पनाथनायकोस (१९७०-७१) आणि बार्सिलोना (१९८५-८६) यांनी अंतिम फेरी गाठली होती.

६ – तब्बल सहा वर्षांनंतर स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि क्रिस्तिआनो रोनाल्डो हे दोन्ही खेळाडूंना चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयश आले आहे. मेस्सीच्या बार्सिलोनाला उपांत्य फेरीत लिव्हरपूलने तर रोनाल्डोच्या ज्युव्हेंटसला उपांत्यपूर्व फेरीत आयेक्सने पराभूत केले.

२ – लिव्हरपूलने सलग दुसर्‍या वर्षी चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठली आहे. मागील वर्षी अंतिम फेरीत त्यांचा रियाल माद्रिदने पराभव केला होता. तसेच बार्सिलोनाने सलग दुसर्‍या वर्षी बाद फेरीचा पहिला लेग ३-० असा जिंकूनही पुढील फेरीत प्रवेश केला नाही. मागील वर्षी इटालियन संघ एएस रोमाविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीतील पहिला लेग त्यांनी ४-१ असा जिंकला होता. मात्र, रोमाने दुसरा लेग ३-० असा जिंकत ’अवे गोल्स’ नियमानुसार उपांत्य फेरीत प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -