कोहली-धोनीत कसोटी कर्णधार म्हणून सामन्यांमध्ये बरोबरी; पण विजयांच्या बाबतीत कोणाचे पारडे जड?

कोहली आणि धोनी या दोघांनीही ६० कसोटी सामन्यांत भारताचे कर्णधारपद भूषवले आहे.

virat kohli, ms dhoni
विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची केवळ भारतीय क्रिकेट नाही, तर जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये गणना होते. कोहली आणि धोनी या दोघांनीही ६० कसोटी सामन्यांत भारताचे कर्णधारपद भूषवले असून विजयांच्या बाबतीत कोहलीचे पारडे जड आहे. कोहलीच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत ६० पैकी ३६ कसोटी सामने जिंकले असून धोनी कर्णधार असताना भारताला २७ सामने जिंकण्यात यश आले होते. कोहलीच्या नेतृत्वात भारताने मागील काही वर्षे कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच भारताने पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली असून हा सामना १८ ते २२ जून या कालावधीत साऊथहॅम्पटन येथे होणार आहे.

कोहलीच्या नेतृत्वात परदेशात यश 

कोहली कर्णधार असतानाच भारताने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचाही पराक्रम केला होता. कोहलीच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत वेस्ट इंडिजमध्ये चार, दक्षिण आफ्रिकेत एक, ऑस्ट्रेलियात दोन आणि इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना जिंकला आहे. परंतु, न्यूझीलंडमध्ये त्याला कर्णधार म्हणून दोन पैकी एकही सामना जिंकता आला नाही. तसेच कर्णधार असताना कोहलीने फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याला ६० सामन्यांत ५९ च्या सरासरीने ५३९२ धावा करण्यात यश आले असून यात २० शतकांचा समावेश आहे.

वनडे, टी-२० मध्ये धोनी वरचढ 

याऊलट मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीने कर्णधार म्हणून कोहलीपेक्षा दर्जेदार कामगिरी केली आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला होता. तसेच भारताने तो कर्णधार असताना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही जिंकली होती. आयसीसीच्या या तिन्ही स्पर्धा जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. कोहलीला मात्र कर्णधार म्हणून आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही.