घरक्रीडाविंडीजचा हार्टब्रेक!

विंडीजचा हार्टब्रेक!

Subscribe

कार्लोस ब्रेथवेटने झंझावाती शतक केल्यानंतरही वेस्ट इंडिजचा संघ विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या 5 धावांनी पराभूत झाला. हा विंडीजचा सहा सामन्यांतील चौथा पराभव होता. या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची 7 बाद 164 अशी अवस्था होती. यानंतर ब्रेथवेटने एकाकी झुंज देत 82 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. मात्र, 7 चेंडूत 6 धावांची गरज असताना जिमी निशमच्या गोलंदाजीवर षटकार लगावण्याच्या नादात तो बाद झाला. त्याचा ट्रेंट बोल्टने अप्रतिम झेल पकडला. त्यामुळे न्यूझीलंड या स्पर्धेत अजूनही अपराजित राहिला आहे.

या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे सलामीवीर मार्टिन गप्टिल (0) आणि कॉलिन मुनरो (0) यांना पहिल्याच षटकात शेल्डन कॉटरेलने माघारी पाठवले. अनुभवी केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी न्यूझीलंडचा डाव सावरत 160 धावांची भागीदारी केली. या दोघांनीही 24 व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, संयमाने खेळणार्‍या टेलरला 69 धावांवर बाद करत क्रिस गेलने ही जोडी फोडली. विल्यमसनने आपली दमदार फलंदाजी सुरु ठेवत 124 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे या स्पर्धेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील 13 वे शतक होते. शतकानंतर त्याने धावांची गती वाढवली. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात तो 148 धावांवर बाद झाला. यानंतर निशम (28), कॉलिन डी ग्रँडहोम (16) आणि मिचेल सँटनर (10) यांनी आक्रमक फलंदाजी केल्यामुळे 50 षटकांत न्यूझीलंडची 8 बाद 291 अशी धावसंख्या झाली. विंडीजकडून कॉटरेलने 4 विकेट्स घेतल्या.

- Advertisement -

292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बोल्टच्या भेदक गोलंदाजीमुळे विंडीजने पहिल्या 2 विकेट्स 20 धावांतच गमावल्या. पुढे गेल आणि शिमरॉन हेटमायर यांनी गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. त्यांनी तिसर्‍या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. गेलने 51 चेंडूत, तर हेटमायरने 42 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, लोकी फर्ग्युसनने हेटमायर (54) आणि जेसन होल्डर (0) यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत विंडीजला पुन्हा अडचणीत टाकले. गेलही षटकार मारण्याच्या नादात डी ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 84 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 87 धावा केल्या. बोल्टने नर्स (1) आणि लुईसला (0) एकाच षटकात माघारी पाठवल्याने विंडीजची 2 बाद 142 वरून 7 बाद 164 अशी अवस्था झाली. यानंतर ब्रेथवेटने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन विंडीजला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपले शतकही पूर्ण केले. मात्र, 6 धावांची गरज असताना तो बाद झाला आणि विंडीजचा पराभव झाला.

ब्रेथवेटकडून अशाच कामगिरीची अपेक्षा – होल्डर
कार्लोस ब्रेथवेट हा प्रतिभावान खेळाडू असला तरी त्याच्या कामगिरीत सातत्य नाही. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 38 सामने खेळले असून, न्यूझीलंडविरुद्ध केलेले त्याचे पहिलेच शतक होते. मात्र, तो मोक्याच्या क्षणी अशी कामगिरी करू शकतो हे आम्हाला ठाऊक होते, असे सामन्यानंतर विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर म्हणाला. ब्रेथवेट कोणत्याही जबाबदारीसाठी तयार असतो. तो कशालाही घाबरत नाही. त्यामुळे या सामन्यात मोक्याच्या क्षणी त्याने जी खेळी केली त्याचे मला आश्चर्य वाटले नाही. मात्र, त्याने कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे. फक्त त्यानेच नाही, तर संपूर्ण संघानेच सातत्यपूर्ण कामगिरी केली पाहिजे, असे होल्डर म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -