Women’s World Boxing Championships : मेरी कोमची अंतिम फेरीत धडक; लोव्हलीनाला ब्रॉंझ

मेरी कोमने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

मेरी कोम
भारताची सुपरस्टार बॉक्सर मेरी कोमने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे ती या स्पर्धेतील विक्रमी सहाव्या सुवर्णपदकापासून अवघी एक पाऊल दूर आहे. तर लोव्हलीना बोरगोहैन हिला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

किम हँग मी वर मात  

महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या ४८ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात मेरीने किम हँग मी वर ५-० अशी मात केली. हा सलग तिसरा सामना होता ज्यात मेरीने प्रतिस्पर्धी बॉक्सरला ५-० अशी धूळ चारली. या सामन्यात मेरीच्या आक्रमणाचे किमकडे काहीही उत्तर नव्हते. त्यामुळे पाच जजनी एकमताने तिला या सामन्याची विजेती घोषित केले. अंतिम फेरीत तिचा सामना युक्रेनच्या हॅना ओखोटा हिच्याशी होईल. मेरीने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत आपले सातवे पदक निश्चित केले होते. याआधी तिने या स्पर्धेत ५ सुवर्ण आणि १ रौप्य अशा एकूण ६ पदकांची कमाई केली आहे. पण अंतिम सामन्यात ती आणखी एक विक्रम आपल्या नावावर करू शकते. तिने जर आता सुवर्णपदक जिंकले तर ती महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक सुवर्णपदक जिंकणारी बॉक्सर बनेल.

लोव्हलीनाला कांस्यपदक  

दुसरीकडे लोव्हलीना बोरगोहैनला मात्र स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत लोव्हलीनाचा चिनी ताइपेच्या चेन निन-चीन हिने पराभव केला. त्यामुळे तिला कांस्यपदक समाधान मानावे लागले.