घरक्रीडाविराटसेना आगे बढो....

विराटसेना आगे बढो….

Subscribe

विराट कोहलीच्या भारतीय संघाने अपेक्षेनुसार वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. २००७ वर्ल्डकपचा अपवाद वगळता भारतीय संघाने अलिकडच्या ४ वर्ल्डकप स्पर्धेत साखळी सामन्यांचा अडथळा पार करताना एकदा जेतेपद, एकदा उपविजेतेपद पटकावले. तसेच गेल्या वर्ल्डकपप्रमाणे यंदाही उपांत्य फेरी गाठली आहे. यंदा उपांत्य फेरीत भारताची गाठ यजमान इंग्लंडशी पडण्याची दाट शक्यता आहे. एजबॅस्टनवरील साखळी लढतीत इंग्लंडने भारताला हरवले होते, यंदाच्या स्पर्धेतील भारताचा हा एकमेव पराभव. उपांत्य फेरीची भारत-इंग्लंड लढत एजबॅस्टनवरच ११ जुलै रोजी होईल. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य झुंज ओल्ड ट्रॅफर्डवर ९ जुलै रोजी रंगेल. यजमान इंग्लंडचे आव्हान परतवून लावत भारत अंतिम फेरीत प्रवेश करणार का? याची उत्सुकता सार्‍यांना आहे.

रोहित शर्माचे फलंदाजातील सातत्य, सलामीला बढती मिळाल्यावर लोकेश राहुलची जिगरबाज फलंदाजी, विराट कोहलीचे सकारात्मक डावपेच, तसेच भारतीय गोलंदाजांची, खासकरुन तेज त्रिकुटाची प्रभावी कामगिरी हे भारताच्या यशस्वी वाटचालीतील प्रमुख घटक. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान या प्रबळ प्रतिस्पर्ध्यांवर मिळवलेले विजय आणि बांगलादेश, अफगाणिस्तानची मोडून काढलेली झुंज, शिवाय विंडीजवरील विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास निश्चितच दुणावला आहे.

- Advertisement -

सलामीवीर शिखर धवनपाठोपाठ अष्टपैलू विजय शंकरला दुखापतीमुळे स्पर्धा अर्ध्यावरच सोडावी लागली. धवनऐवजी रिषभ पंत आणि विजय शंकरऐवजी मयांक अगरवाल यांची निवड करण्यात आली. मयांक अगरवालच्या निवडीवरुन वादंग माजले. वर्ल्डकपच्या राखीव खेळाडूंच्या यादीत मयांक अगरवालसह अंबाती रायडूचा समावेश होता. मधल्या फळीतील फलंदाज विजय शंकरला दुखापत झाल्यावर सलामीवीर मयांक अगरवालची निवड झाली आणि रायडूने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विजय शंकरचा वर्ल्डकप चमूत समावेश केल्यामुळे निवड समितीवर टीका झाली होती. रायडूसारख्या अनुभवी खेळाडूऐवजी विजय शंकरला पसंती दिल्यामुळे मनावा प्रसाद यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. विजय शंकर थ्री-डायमेन्षल खेळाडू असल्याचे प्रसाद यांनी सांगितले होते. परंतु रायडूला वगळून मयांक अगरवालची निवड केल्यामुळे रायडूला राखीव खेळांडूत ठेवून निवड समितीने काय साधले?

इंग्लंडविरुद्ध धोनीच्या संथ फलंदाजीवर टीका करण्यात आली. येत्या रविवारी ३८ व्या वर्षात पदार्पण करणार्‍या धोनीच्या हालचाली मंदावल्या आहेत. परंतु धोनीने यंदा वर्ल्डकपमध्ये ४४.६० च्या सरासरीने २२३ धावाा फटकावल्या असून त्याचा स्ट्राईक रेट ९३ चा आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुलनंतर सर्वाधिक धावा करणार्‍या भारतीय फलंदाजात धोनी चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्ध तो संथ गतीने खेळला. परंतु बांगलादेशविरुद्ध मात्र त्याच्या सावध खेळामुळे भारताने त्रिशतकी मजल मारली. वयस्कर खेळाडूंना (क्रिस गेल, हाशिम अमला) यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खास काही करता आले नाही. धोनीच्या क्रिकेट चातुर्याबाबत शंकाच नाही. परंतु वाढत्या वयामुळे पूर्वीप्रमाणे फिनिशरची भूमिका बजावणे त्याला कठीण जाते.

- Advertisement -

पहिल्या दोन वर्ल्डकप स्पर्धेतील दारुण पराभवांनंतर १९८३ मध्ये कपिलदेवच्या संघाने वर्ल्डकप पटकावला. मायदेशातील (१९८७, १९९६) वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. १९९२, १९९९ मध्ये प्राथमिक फेरीतच भारत गारद झाला. २००७ मध्ये कॅरेबियन बेटांवरील वर्ल्डकप स्पर्धेत बांंगलादेश, श्रीलंकेकडून भारताच्या पदरी पराभव पडले. दुबळ्या बर्मुडाविरुध्द ४०० चा टप्पा भारताने ओलांडला, पण दोन मानहानीकारक पराभवांमुळे साखळीतच गारद होण्याची आपत्ती भारतावर ओढवली. २०११ मध्ये मात्र महेंद्रसिंग धोनीच्या संघाने वानखेडेवर वर्ल्डकप हस्तगत करुन भारतीय क्रिकेट शौकींनांना जल्लोशाची संधी दिली. आता विराटचा संघदेखील वर्ल्डकप जिंकून भारतीय क्रिकेट चाहत्यांना रविवार १४ जुलैला जल्लोशाची संधी देतो का ते बघायचे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -