घरक्रीडाशत्रूचा शत्रू आमचा मित्र

शत्रूचा शत्रू आमचा मित्र

Subscribe

‘दुश्मन का दुश्मन दोस्त होता है’ हा डायलॉग बॉलिवूडमध्ये कित्येक चित्रपटांतून आपण ऐकला असेल. मराठी चित्रपटांतही ‘शत्रूचा शत्रू आमचा मित्र’ म्हणून हात मिळवण्याची भूमिका काही खलनायकांनी वठवली. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकामध्येही ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे. भारत-पाकिस्तानसारखेच कट्टर प्रतिस्पर्धी असलेले इंग्लंड-ऑस्ट्रेलिया २५ जूनला लॉर्ड्सवर एकमेकांशी भिडतील. पण, तत्पूर्वीच यजमान इंग्लंडवासीय कांगारूंना प्रत्येक सामन्यात ‘डॉमिनेट’ करण्याची संधी सोडत नसल्याचे दिसून आले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्थान या सामन्यात स्थानिकांनी अफगाण संघाला पाठिंबा दर्शवत अप्रत्यक्षरित्या ऑस्ट्रेलियाला विरोधच दाखवला. असेच काहीसे चित्र भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावेळीही दिसून आले. संपूर्ण मैदान निळेमय झालेले, त्यात सर्वत्र भारताचा जयघोष…यात इंग्लंड समर्थकही भारताची जर्सी घालून ‘फुल टू जल्लोष’ करताना दिसून आल्याने ‘ऑस्ट्रेलियाचा शत्रू आमचा मित्र’ अशीच काहीसी आपली भूमिका असल्याचे इंग्लंडवासीयांनी दाखवून दिले.

- Advertisement -

भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा कुठलाही सामना म्हटला की, तो हाय व्होल्टेजच होणार हे पूर्वापार सत्य. प्रत्येक चेंडू उत्कंठा वाढवणारा आणि काट्याची टक्कर देणारा असतो. अशीच काहीसी स्थिती इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामन्यांच्या वेळेस दिसून येते. या कट्टर प्रतिस्पर्ध्यांतील सामन्यावेळी खेळाडूच नव्हे, तर प्रेक्षकांतही प्रचंड उत्साह, जोश आणि जिंकण्याची इर्ष्या असते, परंतु यंदा इंग्लंडमध्ये होत असलेल्या या विश्वचषकात तर वेगळेच चित्र बघावयास मिळत आहे.

इंग्लंडच्या चाहत्यांना ऑस्ट्रेलियाचे प्रचंड वावडे असल्याने ते ऑस्ट्रेलियाच्या कुठल्याही सामन्याला प्रतिस्पर्धी संघाला सपोर्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावत असल्याचे दिसून आले आहे. चाहत्यांचा हा उत्साह अनेकदा कॅमेर्‍यांमध्येही कैद झाला आणि सोशल मीडियावरही ‘ट्रोल’ झाला. क्रिकेटच्या भवितव्यासाठी ही बाब स्वागतार्ह नसली, तरी चाहत्यांचा आपल्या देशाच्या संघाप्रती असलेला उत्साह आणि प्रतिस्पर्ध्याला दर्शवलेला विरोध त्यांचे राष्ट्रप्रेमच दाखवतो. त्यामुळे ज्या संघाला ते पाठिंबा देतात, त्या संघाचे मनोबल निश्चितच उंचावते. यामुळे ऑस्ट्रेलियन संघाची मात्र शत्रूच्या देशात प्रत्येक सामन्यागणिक चांगलीच कसोटी लागणार आहे, हेही तितकेच खरे!

- Advertisement -

इंग्लंडमध्ये अनिवासी अधिक
इंग्लंडमध्ये वसाहतवादानंतर मोठ्या संख्येने विविध देशांतील अनिवासी नागरिक स्थिरावले आहेत. इंग्लंडमध्ये आजघडीला सुमारे १५ लाखांहून अधिक भारतीय, १२ लाख पाकिस्तानी, वेस्ट इंडिजचे पाच लाख, बांग्लादेशचे साडेचार लाख, दक्षिण आफ्रिकेचे १७ लाख, श्रीलंकेचे १२.५ लाख, ऑस्ट्रेलियन ७५ हजार, अफगाणी ६० हजार तर न्यूझिलंडचेही अनेक अनिवासी नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे पुढील सहा आठवड्यांत इंग्लंडमधील हे अनिवासी प्रत्येक सामन्यात आपापल्या देशाला चिअर करण्यासाठी मैदानांवर हजेरी लावतील, यात शंका नाही. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, दक्षिण आफ्रिकेचे सर्वाधिक नागरिक येथे स्थायिक झाल्याने या संघांना विश्वचषकात निश्चितच फायदा होत आहे. याउलट ऑस्ट्रेलियाची स्थिती आहे.

कोहलीचे कौतुक
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दाखवून दिलेल्या खिलाडूवृत्तीचे सोशल मीडियावरच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील प्रसारमाध्यमांकडूनही कौतुक करण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना ‘चिटर्स’ म्हणून चिडवणार्‍या प्रेक्षकांना कोहलीने सपोर्ट करण्याचे आवाहन केले. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान कोहलीने दोनदा या बंदीनंतर पुन्हा खेळणार्‍या दोन्ही खेळाडूंना सपोर्ट करण्याचे आवाहन चाहत्यांना केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -