घरक्रीडायंग ब्रिगेडची मोहोर!

यंग ब्रिगेडची मोहोर!

Subscribe

भारतीय संघाने इंग्लंडला कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय या तिन्ही मालिकांमध्ये धूळ चारली. रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी हे प्रमुख खेळाडू या तिन्ही मालिकांना मुकले. तसेच प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह केवळ दोन कसोटी खेळला. मात्र, भारतीय संघाला या खेळाडूंची फारशी उणीव भासली नाही, कारण युवा खेळाडूंनी पुढे येत दमदार कामगिरी केली. रिषभ पंत, अक्षर पटेल, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांसारख्या युवकांनी आपला खेळ उंचावत मोक्याच्या क्षणी महत्वाचे योगदान दिले. त्यामुळे भारताला इंग्लंडविरुद्ध मालिका विजयांची हॅटट्रिक साजरी करता आली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा नुकताच पार पडला. हा दौरा इंग्लंडसाठी विसरण्याजोगा ठरला. विराट कोहलीच्या भारतीय संघाने मात्र अविस्मरणीय कामगिरी केली. कसोटी आणि टी-२० मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. चार सामन्यांची कसोटी आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका भारताने अनुक्रमे ३-१ आणि ३-२ अशी जिंकली. तसेच एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी असताना तिसऱ्या सामन्यात विजयाची नोंद करत कोहलीच्या भारताने तीन सामन्यांची ही मालिका २-१ अशी खिशात घातली. भारताच्या या यशात युवा खेळाडूंची भूमिका महत्वाची ठरली.

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतसाठी या तिन्ही मालिका कारकिर्दीला कलाटणी देणाऱ्या ठरल्या, असे म्हणणे वावगे ठरू नये. निराशाजनक फलंदाजी आणि यष्टिरक्षणातील चुका यामुळे पंतवर बरीच टीका झाली आहे. मात्र, इंग्लंड मालिकेत त्याने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. यावर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातील कसोटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली. या कसोटी मालिकेचा अखेरचा सामना गॅबा येथे झाला, जिथे ऑस्ट्रेलियाने ३२ वर्षांत एकही कसोटी सामना गमावला नव्हता. मात्र, भारताने अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवला, तो पंतमुळेच! त्याने दुसऱ्या डावात नाबाद ८९ धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. हा दमदार फॉर्म त्याने इंग्लंड मालिकेतही कायम राखला.

- Advertisement -

इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत पंतने ५४ च्या सरासरीने २७० धावा फटकावल्या. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो तिसऱ्या स्थानावर राहिला. तसेच अहमदाबाद येथे झालेल्या चौथ्या कसोटीत भारतीय संघ अडचणीत असताना त्याने १०१ धावांची खेळी केली. भारतातील हे त्याचे पहिलेच शतक ठरले. त्याच्या या कामगिरीमुळे भारताला या कसोटीत विजय मिळवणे शक्य झाले.

कसोटी मालिकेनंतर त्याने टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतही आपले नाणे खणखणीत वाजवले. टी-२० मालिकेत त्याने ५ सामन्यांत १०२ धावा केल्या, तर एकदिवसीय मालिकेच्या दोन सामन्यांत दोन अर्धशतकांसह पंतने १५५ धावा फटकावल्या. त्याने या मोसमात केलेल्या कामगिरीने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक प्रभावित झाला. ‘पंत अशीच कामगिरी करत राहिला, तर तो महेंद्रसिंग धोनी आणि अ‍ॅडम गिलख्रिस्ट या महान यष्टीरक्षक-फलंदाजांनाही मागे सोडेल,’ असे विधान इंझमामने केले.

- Advertisement -

डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलसाठीही इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका अविस्मरणीय ठरली. दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत तो खेळू शकला नाही आणि भारताने हा सामना गमावला. त्यामुळे संपूर्ण संघावरच खूप दबाव होता. त्यातच दुसऱ्या सामन्यात अक्षरला कसोटीत पदार्पणाची संधी मिळाल्याने त्याच्यावर अधिकच दडपण होते. मात्र, या गोष्टीचा त्याच्या खेळावर परिणाम झाला नाही, उलट त्याचा खेळ अधिकच बहरला. त्याने कसोटी पदार्पणातच ७ गडी बाद केले. या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडचा निम्मा संघही गारद केला.

या मालिकेतील अखेरचे दोन्ही कसोटी सामने अहमदाबादला झाले. आपल्या घरच्या मैदानावर खेळताना अक्षरने या मालिकेच्या तिसऱ्या आणि आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्या कसोटीत ११ गडी (पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ५) बाद केले. या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये त्याला पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्यात यश आले. ही कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील केवळ दुसरा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी भारताच्याच झहीर खानने (२००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध) ही कामगिरी केली होती.

अक्षरने या मालिकेतील चौथ्या कसोटीतही उत्कृष्ट गोलंदाजी करत ९ विकेट (पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५) घेतल्या. त्याने कसोटी मालिकेत एकूण २७ विकेट घेत भारताकडून आपल्या पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याच्या दिलीप दोषी यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. अक्षरप्रमाणेच डावखुरे फिरकीपटू असणाऱ्या दोषी यांनी पदार्पणाच्या कसोटी मालिकेत २७ विकेट घेतल्या होत्या, पण त्यांनी ही कामगिरी सहा सामन्यांत केली होती. अक्षरने तीन सामन्यांतच २७ मोहरे टिपत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.

कसोटी मालिकेनंतर टी-२० मालिका पार पडली. या मालिकेत ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव या फलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. २२ वर्षीय ईशानने पदार्पणातच सलामीला येताना ३२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना बॅकफूटवर टाकले. याचा फायदा इतर फलंदाजांनाही झाला आणि भारताने सहजपणे हा सामना जिंकला. त्यामुळे ईशानलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. यानंतर मात्र तो केवळ एकच सामना खेळू शकला. दुखापतीमुळे त्याला अखेरच्या दोन सामन्यांना मुकावे लागले.

ईशानप्रमाणेच सूर्यकुमारचीही कामगिरी कौतुकास्पद ठरली. ३० वर्षीय सूर्या तसे म्हणायचे तर युवा नाही. मात्र, त्याला भारतीय संघातील संधीसाठी फार काळ वाट पाहावी लागली. स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून तीन-चार वर्षे सातत्याने धावा केल्यानंतर त्याच्यासाठी भारतीय संघाची दारे खुली झाली. मात्र, पदार्पणाच्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही आणि पुढील सामन्यासाठी त्याला संघातून वगळण्यात आले. मात्र, चौथ्या टी-२० सामन्यात ईशानला दुखापत झाली आणि सूर्याचे संघात पुनरागमन झाले.

या सामन्यात त्याला विराट कोहलीच्याही आधी म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी मिळाली. सूर्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला आणि पुढेही फटकेबाजी सुरु ठेवत केवळ २८ चेंडूत आपले पहिलेवहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने एकूण ३१ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. या मालिकेतील निर्णायक सामन्यातही त्याला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली आणि पुन्हा त्याने आक्रमक शैलीत फलंदाजी करत अवघ्या १७ चेंडूत ३२ धावा काढल्या. त्यामुळे सामन्यानंतर कर्णधार कोहलीने सूर्याचे कौतुक केले.

पंत, अक्षर, ईशान आणि सूर्याप्रमाणेच वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांसारख्या युवा खेळाडूंनीही भारतीय संघाच्या यशात महत्वाचे योगदान दिले. तसेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने पदार्पणात चार विकेट घेण्याची विक्रमी कामगिरी केली. त्यामुळे मागील काही काळात भारताच्या यंग ब्रिगेडने जागतिक क्रिकेटवर आपला ठसा उमटवला असून भारतीय संघाचे भविष्य उज्ज्वल असल्याचेही दाखवून दिले आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -