घरक्रीडाशरद पवारांनी खेळांना उंच शिखरावर नेले; एका क्रीडा संघटकाची कृतज्ञता

शरद पवारांनी खेळांना उंच शिखरावर नेले; एका क्रीडा संघटकाची कृतज्ञता

Subscribe

क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारा द्रष्टा नेता म्हणून शरद पवार यांना देशातच नव्हे, तर सार्‍या जगात त्यांच्या नावाला वलय प्राप्त झालेले आहे. विविध खेळांत क्रीडा सुविधा, क्रीडा साहित्य, सवलती व अनुदाने मिळवून देण्यात त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. हे करत असताना विविध खेळांना प्रसिद्धीचे वलय प्राप्त करून देण्यात यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. यामुळे राज्य व केंद्र शासनाने त्याची दखल घेऊन आपल्या अर्थसंकल्पात अधिक वाढ केली. पवारांनी विविध खेळांच्या ‘क्रीडा संघटकांची’ मोट बांधून त्यांच्यातील कार्यक्षमता, त्यांच्या गुणांना प्रेरणा व ऊर्जा देण्याचे काम करून विविध खेळांना उंच शिखरावर नेण्याचे काम केलं. हे कुणीही नाकारू शकत नाही. पवार साहेबांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यांना त्यांच्या आवडीच्या विविध क्षेत्रात जोमाने कार्य करण्यास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरी चरणी प्रार्थना मी व माझ्या युवक क्रीडा मंडळ, मुंबईच्यावतीने करतो!

पवारांनी शाळा व महाविद्यालयात असताना त्यावेळचा हुतुतू आताचा कबड्डी, खो-खो व ज्युडो या खेळांत खेळाडू म्हणून आपली कारकीर्द गाजवली होती. नामवंत ज्युडोपटू खानिवाले हे त्यांच्या पुण्यातील बी.एम.सी. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक होते. त्यांनी पवारांना ज्युडोचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले. खेळांची ही प्रेरणा व ऊर्जा पुण्यात असताना सकारात्मक विचार करण्यास त्यांना भाग पाडत होती. विविध खेळांच्या संघटनांची विविध ठिकाणी बांधणी केल्याशिवाय या खेळांचा विकास व प्रचार-प्रसार होणार नाही हे त्यांना कळलं होतं.

- Advertisement -

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षात विद्यार्थी नेता म्हणून पवार कार्यरत झाले. याचदरम्यान ते नवयुवक मासिक स्वतः संपादक राहून प्रकाशित करू लागले. या मासिकातून ते ग्रामीण, तसेच शहरातील युवकांना शेती, शेतीपुरक धंदे व उद्योगधंद्यांबद्दल मार्गदर्शन करत होते. यशवंतराव चव्हाण यांच्याकडून लाभलेला साहित्य, नाट्य, कृषी, सहकार, क्रीडा यासोबत महाराष्ट्राची संस्कृती या सर्व गुणांचा वारसा पुढे चालू राहण्यासाठी त्यांनी सतत नव्याने प्रयोग केले. राजकारणात नेत्यांची बेरीज झाली म्हणजे पक्ष आपोआप वाढत नाही, फक्त विरोध कमी होतो ही यशवंतरावांची शिकवण पक्की ठाऊक होती. पक्षाच्या विस्तारासाठी पंचविशीतल्या तरुणांची भक्कम फळी जागोजाग उभी केली पाहिजे, हे तत्व लक्षात ठेऊन पवारांनी खेळांचा प्रचार-प्रसार व विविध खेळ वाढविण्याच्या कामी क्रीडा संघटनांची व गुणी खेळाडूंची मोट बांधण्यास सुरुवात केली.

तसं पाहता पवारांची राजकीय सुरुवात महाविद्यालयीन काळातच झालेली होती. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात पुण्यातील सोमवार पेठ येथे काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षपदापासून झाली. पुढे पवारांना युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यपक्षपदाची नामी संधी प्राप्त झाली. आईच्या सल्ल्यामुळे त्यांनी शिक्षणाकडे पाठ फिरवून राजकारणाकडे अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन, दादर या नव्या वास्तूत आलेले होते. पवारांची स्वतंत्र कार्यशैली आणि विचारांची बैठक विकसित होत गेली. त्यावेळी सरचिटणीसपदी पुण्याचेच क्रीडाप्रेमी मोहन धारिया होते, राष्ट्रीय कबड्डीपटू साधना धारियाचे वडील. या दोघांचेही निवासस्थान टिळक भवन होते. आपल्या पक्षाचे विचार तरुणांपर्यंत पोहचविण्याकरता राज्यात विविध ठिकाणी त्यांचे दौरे चालू असत.

- Advertisement -

या दौर्‍यादरम्यान ग्रामीण व शहर असा भेद निश्चित स्वरूपात जाणवत होता. क्रीडा क्षेत्र हे फक्त शहरी भागात काही प्रमाणात विकसित झालेलं होतं. त्या दरम्यान मुंबई, पुणे, ठाणे सांगली, सातारा, नाशिक आदी शहरांतून शारीरिक शिक्षण मंडळच्यावतीने जिल्हा, राज्य तर अखिल भारतीय स्तरावर अखिल भारतीय शारीरिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्यासाठी हुतुतू, खो-खो, कुस्ती यांच्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जात. परंतु, प्रत्येक जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय स्तरावर राज्य व केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त होत नसल्याने खेळांचा विकास म्हणावा तसा होत नव्हता. सुरुवातीला अखिल भारतीय शारीरिक शिक्षण मंडळ आणि त्यांच्या संलग्न संस्था, मंडळांत वारंवार वाद निर्माण होऊ लागले. त्या काळात स्पर्धांचे प्रमाणच विरळ होते. महाराष्ट्र शासनाच्यावतीने 17 वर्षांखालील व 21 वर्षांखालील विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर आयोजित करण्यात येत. आम्ही या स्पर्धांत सहभागी होऊन राज्य स्तरावर मुंबई संघाला सुवर्णपदके (खो-खो) मिळवून दिलेली आहेत. 1970 सालानंतर हा क्रीडा महोत्सव बंदच झाला.

संघटनांच्या भांडणाच्या कालावधीत मुंबईतील युवक क्रीडा मंडळांनी आपले पुरुष-महिलांचे हुतुतू व खो-खो संघ स्वतंत्ररित्या ‘वन गेम वन फेडरेशन’नुसार त्या-त्या संघटनेस संलग्न होण्यास सुरुवात केली. आम्ही संलग्न होताच आमच्यासोबत अनेक शैक्षणिक व महाविद्यालयीन संघ संलग्न झाले. परंतु, खाजगी संस्था, मंडळे व क्लब संलग्न होण्यासाठी पुढे येत नव्हते. याचदरम्यान युवकचे युवा कार्यकर्ते व बुर्जुग मंडळी अ‍ॅड. वाय.ए.गोळे, शंकरराव उर्फ बुवा साळवी, कमलाकांत ठाकूर, टी.आर. नाईक, रघुनाथ नलावडे, रमेश डिचोलकर, बाबी चौकेकर, अरूण लाड शिवाय शैक्षणिक व महाविद्यालये प्रिन्सिपल, हेडमास्तर आदी मंडळींनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी ग्रामीण भागात क्रीडा संघटना बांधण्यास सुरुवात केल्या आणि या संघटना त्या-त्या भागात जोर पकडू लागल्याचे चित्र दिसू लागले. त्यामुळे पवारांनाही खूप आनंद झाला. युवकची तरुण-तरुणी मंडळी क्रीडाक्षेत्रात करत असलेल्या कार्यासाठी, तसेच त्यांनी पुढेही मोठ्या प्रमाणात कार्यरत रहावे यासाठी पवारांच्याच नेतृत्वाखाली युवकने ‘कै. रामचंद्र नाईक सुवर्ण ट्रॉफी’ खो-खो स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धांच्या आयोजन समितीचे अध्यक्ष स्वतः शरद पवार होते. 1963, 1965 आणि 1967 मध्ये परळच्या सेंट झेविअर येथे झालेल्या या स्पर्धेत गुजरात, पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, मध्यभारत, मध्य प्रदेश, हैदराबाद, कर्नाटक व दिल्ली यांसारख्या राज्यांतील नामांकित संघांनी सहभाग घेतला होता.

पवारांनी क्रीडा व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे 1967 सालची आमदारकीची पहिली विधानसभा निवडणूक बारामतीतून लढवून ते प्रचंड मतांनी विजयी झाले. ते आमदार झाल्याने, विकासकामे व शेतीच्या आधुनिकतेमुळे पाच वर्षांत बारामतीचा बराच मोठा कायापलट झाला. 1972 च्या निवडणुकीत पुन्हा प्रचंड मतांनी निवडून आल्यावर त्यांना राज्यमंत्री प्राप्त झाले. ते गृह, क्रीडा, अन्न व नागरी पुरवठा, राज शिष्टाचार ही खाती त्यांना प्राप्त झाली. त्यानंतर ते कॅबिनेट मंत्रीदेखील झाले. याचदरम्यान विविध खेळांच्या जिल्हा व राज्य क्रीडा संघटनांना चांगल्या तर्‍हेने सुविधा, सवलती व अनुदाने देऊन संघटनांची बांधणी करत त्यांनी भारतीय स्तरावरील देशी खेळांच्या संघटनांचीही योग्य तर्‍हेने बांधणी केली. मोहन धारिया यांना अखिल भारतीय हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपद त्यांनी मिळवून दिले.

पवारांनी पुढे तीन ते चार दशकांत खो-खो, कबड्डी व कुस्ती या देशी तिन्ही खेळांच्या राज्य संघटनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिकचेही त्यांनी अध्यक्षपद भूषविले. पवार महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षस्थानी असताना मला देखील जवळपास दोन दशके संयुक्त चिटणीस व सदस्य म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांच्या विशिष्ट कार्यपद्धतीच्या कार्यशैलीमुळे, प्रशासकीय कार्यपद्धत, व्यवस्थापन व तांत्रिक कार्यपद्धतीचा अभ्यास करता आला. आजही ते मुंबईच्या मराठा मंदिर या संस्थेचे अध्यक्षपद भूषवत असल्याने आणि मी तिथे कार्यकारिणीत कार्यरत असल्याने, त्यांच्या ज्ञानाचा व मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला आजही लाभत असतो. 1980 साली आमच्या ‘युवक’ क्रीडा मंडळाचा रौप्य महोत्सवी सोहळा आम्ही सेंट झेविअरच्या मैदानावर मोठ्या उत्साहाने साजरा केला. याही स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्षपद शरद पवारांनी स्वीकारून या स्पर्धेतून नवा आदर्श सर्व क्रीडा संघटनांना घालून दिला.

त्यांचा देशी खेळांच्या संघटनांसाठी कार्यरत असलेला गतकाळ हा महाराष्ट्र राज्यासाठी सुवर्णकाळ ठरलेला होता, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच ‘युवक’ संस्थेने पवारांना क्रीडा संघटक म्हणून प्रेरणा व ऊर्जा देण्याचं काम नक्कीच यशस्वी करून दाखविलेलं आहे.

आता मात्र पवारांनी ज्या कार्यकर्त्यांना, क्रीडा संघटकांना मोठं केलं, घडवलं, त्यातील प्रामाणिक व पारदर्शकपणे कार्य करणारी मंडळी विविध जिल्ह्यातून ज्येष्ठतेनुसार बाजूला झालेली दिसतात, तर काहींना जाणूनबुजून बाजूला काढलेले दिसते. आता फक्त पदांच्या खुर्च्यांसाठी बेरजेचे राजकारण करणारी स्वार्थी कार्यकर्ते मंडळीच सर्व जिल्हा संघटनांत पहावयास मिळत आहेत. खेळांच्या विकासाकडे, त्यांच्या गुणवत्तेला लक्ष न देता शासकीय व संघटनेच्या माध्यमातून स्वतःचा विकास कसा होईल, ही प्रवृत्ती अधिक क्रीडा संघटनांतून पहावयास मिळते. धर्मादाय आयुक्त यांच्या विविध कलमांचा भंग करूनच आज अनेक क्रीडा संघटना कार्यरत असल्याच्या दिसतात. धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालयदेखील या गोष्टींना पाठिंबा देताना दिसतात.

पूर्वीप्रमाणे आता विविध क्रीडा संस्था, संघ किंवा मंडळातून प्रामाणिकपणे क्रीडा संघटक म्हणून काम करणारी निस्वार्थी मंडळी विरळ झाल्याचे दिसत आहे. या गोष्टीचा नव्या शासनाने गंभीरपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. आता नव्याने स्थापन होणारे सरकार क्रीडाक्षेत्रासाठी कोणती नवी धोरणे किंवा स्पोर्ट्स आचासंहितेसाठी कोणती नव्याने पावले उचलणार हा देखील आता चर्चेचा विषय आहे. क्रीडाक्षेत्राच्या यशासाठी पवारांनीही क्रीडा संघटनांना योग्य मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
त्यांना उदंड आयुष्य लाभो.


लेखक – मनोहर आ. साळवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -