घरठाणेआधारकार्ड ठरले विपुलसाठी वरदान सहा वर्षांनी झाली कुटुंबाची भेट

आधारकार्ड ठरले विपुलसाठी वरदान सहा वर्षांनी झाली कुटुंबाची भेट

Subscribe

भारतात आधारकार्ड हे सध्या सर्वांत महत्त्वाचे कागदपत्र आहे. ओळखपत्र म्हणून आधारकार्डचा वापर केला जातो. अनेक सरकारी योजनांमध्ये आणि महत्त्वाच्या आर्थिक तसेच इतर व्यवहारांसाठी आधारकार्ड अत्यावश्यक आहे. इतके महत्त्व देशात आधारकार्डचे आहे. हेच आधारकार्ड आता एका तरुणासाठी वरदान ठरले आहे.आधारकार्डमुळे या तरुणाची आपल्या कुटुंबाशी तब्बल सहा वर्षांनंतर भेट झाली.

डोंबिवलीत राहणारा विपुल सहा वर्षांपूर्वी कोणालाही न सांगता घरातून निघून गेला, मात्र आधारकार्डमुळे विपुल ठाणे शहर पोलिसांच्या प्रयत्नाने नुकताच स्वगृही परतला. त्यातच त्याच्या चुलत भावाच्या लग्नाला तो परतल्याने कुटुंबाचा आनंद द्विगुणीत झाला. त्याने अपडेप केलेले आधारकार्डच त्याच्यासाठी स्वगृही येण्यासाठी प्रमुख आधार ठरले. तो दिल्लीत असल्याचे समोर आल्यावर ठाणे शहर पोलिसांनी दिल्ली, नोएडा येथे शोधमोहीम राबवून त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. कुटुंबाला पाहून विपुलच्या चेहर्‍यावर आनंद स्पष्ट दिसत होता. १९ वर्षांचा असताना निघून गेलेला विपुल आता २५ वर्षांचा झाला आहे.

- Advertisement -

मूळ गुजरात येथील रहिवासी असलेला विपुल हा डोंबिवलीत त्याच्या काकांकडे लहानाचा मोठा झाला. त्याला त्याच्या काकांनी कपड्यांचे दुकान उघडून दिले होते, मात्र तो शांत स्वभावाचा आणि कमी बोलणारा असल्याने त्याला तेथे कंटाळा येत होता. त्यामुळे तो कोणालाही काही न सांगता ७ मे २०१६ रोजी घरातून निघून गेला. सुरुवातीची दोन वर्षे तो कर्नाटकमध्ये राहिला. त्यानंतर तो दिल्लीत गेला. तेथील एका आश्रमात चार वर्षांपासून काम करून तो राहत होता. याच दरम्यान त्याने त्याचे आधारकार्ड अपडेट केले.

त्या आधारकार्डवरील पत्ता गावाकडील असल्याने अपडेट आधारकार्ड गावाच्या पत्त्यावर पोस्टाने गेले. या आधारकार्डवरील माहितीवरून त्याच्या नातेवाइकांनी डोंबिवली पोलीस ठाणे गाठत याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्याचा तपास डोंबिवली पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती चव्हाण यांच्या पथकाने अवघ्या १५ दिवसांत नोएडा येथून विपुलला शोधून स्वगृही आणले.

- Advertisement -

अपडेट केलेले आधारकार्डच विपुलसाठी घरवापसीचा आधार ठरले. त्याच्या मनात घरी येण्याची इच्छा होती, पण घरातील रागावतील या भीतीने तो येणे टाळत होता. आश्रमात तो गोरगरिबांना जेवण वाटपाचे काम करीत असे. तसेच तेथे तो मित्रांसोबत राहत होता. कुटुंबात आल्याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर दिसत होता. त्यातच त्याच्या चुलत भावाचे लग्न असल्याने त्या कुटुंबाचा आनंद द्विगुणीत झाल्याचे प्रखरतेने दिसत होते.
– प्रीती चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक, ठाणे शहर पोलीस दल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -