घरठाणेशेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा आत्मदहनाचा इशारा

शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा आत्मदहनाचा इशारा

Subscribe

कल्याण-काटई-बदलापूर रस्त्यावरील वसार गावातील शेतकऱ्याला भूसंपादनाचा योग्य मोबादला एमआयडीसीने दिला नाही तर या शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आपण राॅकेल ओतून जाळून घेऊ, असा इशारा भाजपचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी बुधवारी दिल्याने खळबळ उडाली आहे.
एमआयडीसी, पोलिसांसमोरच आमदार गायकवाड यांनी हा इशारा दिल्याची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. आमदार गायकवाड यांच्या इशाऱ्याची चित्रफित एमआयडीसीचा एक सुरक्षा जवान मोबाईलच्या माध्यमातून काढत होता. गायकवाड यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी त्या जवानालाही फैलावर घेतले. वसार गावातील एका शेतकऱ्याला बदलापूर महामार्गासाठी संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही. या शेतकऱ्याची जमीन चुकीने एमआयडीसीने मोबादला न देता संपादित केली आहे. हा मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्याने एमआयडीसीकडे ५० वर्षापासून प्रयत्न चालविले आहेत. त्याला यश येत नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने रस्त्यावरील मालकीच्या भागात दोन महिन्यापूर्वी भाजीपाला लागवड केली. रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. एकेरी मार्गिकेमुळे येथे दररोज वाहन कोंडी होते.

वसार गावातील शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसीने ५० वर्षापूर्वी जलवाहिनी टाकण्यासाठी संपादित केली होती. अधिकाऱ्यांच्या कागदी चुकीमुळे रस्त्या लगतची एका शेतकऱ्याची खासगी जमीन एमआयडीसीच्या नावावर झाली. ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात आली. ही जमीन आपल्या संमतीविना संपादित केली आहे, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. रस्त्या लगतची आणि बाजुची शेतकऱ्याच्या जमिनीवर एमआयडीसीने कब्जा केला आहे. या जमिनीवर एमआयडीसीचा कब्जा असल्याने शेतकऱ्याला तेथे लागवड किंवा बांधकाम करता येत नाही. शेतकऱ्याने दोन महिन्यापासून रस्ता अडवून भाजीपाला लागवड केल्याने एमआयडीसीने दोन दिवसापूर्वी पोलीस फौजफाटा घेऊन शेतकऱ्याची रस्त्यावरील लागवड नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तेथे आ. गायकवाड पोहचले. त्यांनी ५० वर्षापासून जमीन नावावर होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला एमआयडीसी न्याय देत नसेल आणि त्याची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत असेल,त्याला योग्य मोबदला देणार नसेल तर त्या शेतकऱ्यासाठी आपण अंगावर राॅकेल ओतून घेऊन आत्मदहन करू, असा इशारा एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिला. आमदार गायकवाड यांचा रुद्रावतार पाहून अधिकारी, पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली. वसार गावातील रस्त्यावर लागवड कायम राहिली तर या भागात दररोज होणाऱ्या वाहन कोंडीचे करायचे काय असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला आहे. एमआयडीसी, शेतकऱ्याचा वादाचा फटका प्रवाशांना नाहक बसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -