उल्हासनगरातील सोंग्याच्या वाडीत बिबट्याचा वावर

परिसरात भीतीचे वातावरण

मागच्या आठवड्यात अंबरनाथ आॅर्डीनन्स कंपनीला लागून असलेल्या जंगलात एक बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला. त्यानंतर बिबट्याने उल्हासनगरातील सोंग्याच्या वाडीत शिरकाव केला आहे. सुभाष टेकडी रोडवर अंबरनाथ जवळील वालधुनी नदीच्या काठावर ही सोंग्याची वाडी आहे. जंगल आणि शेकडोंच्या संख्येने झाडे असलेल्या या वाडीचा परिसर 10 ते 15 एकराचा आहे. मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी मैत्रिणी सोबत गेलेल्या भरत नगरातील एका मुलीला हा बिबट्या दिसताच आणि वाऱ्यासारखी ही बातमी पसरली. आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वन विभागाचे अधिकारी प्रमोद ठक्कर, प्रमोद वारके, दिनेश मल्होत्रा यांनी विठ्ठलवाडी पोलीस, काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे अध्यक्ष विशाल सोनवणे, निर्भय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधीर बागुल आदी समाजसेवकांसोबत बुधवारी रात्री उशिरापर्यंत या बिबट्याचा शोध घेतला आहे.

तीनचार ठिकाणी पंजाचे ठसे
बुधवारी सकाळी पुन्हा वन विभागाचे पथक सोंग्याच्या वाडीत दाखल झाले असून त्यांना तीनचार ठिकाणी पंजाचे ठसे दिसले आहेत. या ठश्यांचे फोटो वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्यात येणार असून त्याची खात्री झाल्यावर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे आणले जाणार आहेत.

तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी
स्थानिक नगरसेवक आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीचे सभापती प्रमोद टाले यांनी उल्हासनगर तालुका वन विभागाचे मुख्य अधिकारी प्रमोद ठक्कर यांना पत्र पाठवले आहे. त्यात सोंग्याच्या वाडीत दोन डुकरे अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळली आहेत. ते पाहता वाडीत बिबट्या असण्याची दाट शक्यता असून त्यासाठी त्याला पकडण्यासाठी तात्काळ पिंजरे लावण्यात यावेत अशी मागणी केली आहे.