घरठाणेडोंबिवलीत गुलाबी थंडीची चाहूल

डोंबिवलीत गुलाबी थंडीची चाहूल

Subscribe

पारा 14 अंशावर

गेल्या दोन दिवसांपासून डोंबिवलीच्या तापमानात चांगलीच घट झाल्याचे अनुभवायला मिळत आहे. गेले दोन दिवस पारा एका एका अंशाने कमी होत असल्याचे चित्र आहे.सोमवारी डोंबिवलीत पारा 14 अंशावर खाली आला होता. त्यामुळे हवेत चांगलाच गारठा जाणवत होता.तापमानात झालेली घट ही एका अर्थाने गुलाबी थंडीची चाहूलच म्हणावी लागेल.
वास्तविक दिवाळीच्या पूर्वी थंडीला सुरुवात होत असते. मात्र तापमानातील बदलामुळे गेली काही वर्षे दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी थंडी अनुभवायाला मिळत नाही.

यंदा दिवाळीच्या सुरुवातीला थंडी नव्हती, मात्र थोडासा गारठा नक्कीच जाणवत होता. मात्र दिवाळी नंतर पुन्हा तापमानात वाढ झाली आणि गारठा गायब झाला. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा गारठा पडू लागला आहे. विशेषतः खाडी किनारी आणि ग्रामीण भागातील मोकळ्या ठिकाणी रात्रीच गारठा जाणवत आहे. तापमानात दर दिवशी एका एका अंशाने घट होत असल्याचे चित्र आहे.सोमवारी डोंबिवलीत 14 .8 अंश सेल्सियस इतके तापमान होते. उत्तरेतून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे आणि कमी आद्रतेमुळे तापमानात घट होत असून गुलाबी थंडी सुरु झाल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

थंडी वाढल्याने ग्रामीण भागातील शेकोट्या पेटल्या
मुरबाड । गेल्या दोन दिवसापासून वातावरणातील थंडी वाढल्याने ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे. या शेकोटीजवळ घरातील आबालवृद्धांसह लहान मुले तसेच शेजारील मित्रमंडळीही जमू लागल्याने गप्पांचे फड रंगू लागले आहेत. तालुक्यात दोन दिवसांपासून संध्याकाळपासून कडक थंडी जाणवू लागली आहे. यामुळे ग्रामीण भागातील गावांंमध्ये रोज रात्री अनेक ठिकाणी आपल्या अंगणात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

या शेकोटीसाठी लागणारी लाकडे घरातच मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने या शेकोट्यांचा अग्नी सतत धगधगत असतो. संध्याकाळी शेकोट्या पेटल्यानंतर घरातील आबालवृद्ध, लहान मुले, तसेच शेजारील राहणारे,आपले मित्र, नातेवाईक यांना शेकोटीजवळ बोलावले जाते. यामुळे नात्यांतील एकता अधिक जवळ येत असल्याने या शेकोटीजवळ थंडी दूर करण्याबरोबरच आत्मियता निर्माण होत असल्याने विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.

- Advertisement -

त्यामुळे या शेकोटीजवळ बसून गप्पांच्या फडात रंगून जाण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. यामध्ये घरातील कामे, शेतीची कामे, सोयरेधायरे यांच्या बाबतीत ते राजकारणाच्या गप्पा मारल्या जातात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी तर ग्रामीण भागातील शेकोटीवर चणे भाजून खाल्ले जातात. यामुळे या शेकोटीजवळ बसणे हे आबालवृद्धांसह लहानग्यांना एक आनंदाची पर्वणीच असते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -