घरठाणेनॅशनल हायवेकडून सव्वा तीनशे झाडांची कत्तल

नॅशनल हायवेकडून सव्वा तीनशे झाडांची कत्तल

Subscribe

एक वर्ष उलटूनही झाडांची उभारणी नाही

कल्याण तालुक्यातील म्हारळ ते पाचवा मैल या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 चे रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ठाणे विभागाने दुतर्फा असणाऱ्या 300 ते सव्वा तीनशे झाडांची कत्तल केली होती. एक वर्ष उलटूनही कत्तल केलेल्या जागेवर नॅशनल हायवे कडून एकही झाड लावले नसल्याचे उघड झाले आहे. नॅशनल हायवे कडून कल्याण वन विभागाला रस्ता काँक्रेटीकरणासाठी झाडे अडचणीचे ठरत असल्याने ती तोडण्याची परवानगी मागितली होती. वन विभागाने अटी व शर्थी राखत सव्वा तीनशे झाडे या ठिकाणी लावण्याचे हमीपत्र नॅशनल हायवे कडून घेतले होते. 2022 पर्यंत पावसाळ्यात लावण्याची हमी नॅशनल हायवेने देऊनही ती अद्याप पर्यंत लावण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे.
कल्याण नगर ६१ महामार्गावर राष्ट्रीय महामार्गाने रस्ता कॉंक्रिटीकरण दरम्यान वनविभागाच्या हद्दीतील सव्वा ३०० झाडे परवानगी घेत तोडली होती. मात्र या बदल्यात तितके झाडे महामार्ग विभागाने या ठिकाणी लावणे गरजेचे असताना याकडे त्यांनी सपशेल पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी रस्ता कॉंक्रिटीकरण करताना दुतर्फा रस्त्यावरील  तोडलेल्या झाडाच्या जागी गटारी बांधण्यात आली असून झाडे लावण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने झाडे कुठे लावावीत असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हारळ ते पाचवा मैल दरम्यान सव्वा तीनशे विविध प्रजातीची झाडे तोडल्याने या बदल्यात नॅशनल हायवेने एकही झाड या ठिकाणी लावले नसल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील वृक्ष प्रेमींनी केली आहे. दरम्यान याबाबत वनविभागाचे वनपरिक्षेत्र पाल आर एन चन्ने यांना याबाबत विचारणा केली असता वृक्षतोडीची परवानगी देताना बदल्यात जितके वृक्षतोड संख्या असेल तितक्या प्रमाणात वृक्ष लावण्याचे आम्ही हमीपत्र संबंधितांकडून घेत असल्याचे सांगत नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे चन्ने यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -