पुन्हा ठाणे शहर पोलिसांचे ऑल आऊट कोबींग ऑपरेशन

129 गुन्हे नोंदवत 116 जणांना बेड्या

ठाणे शहर पोलिसांनी ठाणे, भिवंडी, कल्याण डोंबीवली, उल्हासनगर व अंबरनाथ या
पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुन्हा एकदा राबविलेल्या ऑल आऊट कोबींग मोहीमेत अवैध्य शस्त्रजप्ती, फरार, अग्नीशस्त्रे बाळगणे, हॉटेल, डान्सबार तपासणे आदींसह इतर प्रकारच्या मोहिमेत 129 गुन्हे दाखल करत, तब्बल 116 जणांच्या हाती अवघ्या पाच तासात बेड्या घालण्यात यश आले आहे. तसेच 1 लाख 13 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जित सिंह यांच्या आदेशान्वये 24 फेब्रुवारीला रात्री 9 वाजता सुरू होऊन 25 फेब्रुवारी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत पोलीस सह आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त यांच्या मार्गदशनाखाली पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व गुन्हे शाखेतील सर्व घटकांचे प्रभारी अधिकार्‍यांच्या मार्फत गुन्हेगारी कृत्याला आळा बसावा या उद्देशाने ऑल आऊट कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले होते. त्यानुसार अवैध्य शस्त्र बाळगणे, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142, अवैध्य धंद्यावर केलेली कारवाई, पॅरोल उल्लंघन आरोपींचा शोध घेणे, वाहने तपासणे, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, लॉजेस, डान्सबार, हॉटेल, पब यांची तपासणी करणे, सराईत गुन्हेगारीवरांवर प्रतिंबधक कारवाई करणे आदी मोहीम यावेळी राबविण्यात आली. त्यासाठी 223 पोलीस अधिकारी व 1054 पोलीस अंमलदार इतके मनुष्यबळ वापरण्यात आले होते. त्यानुसार 129 गुन्हा नोंदविण्यात आले असून 116 जणांना अटक करण्यात आली. तसेच 1 लाख 13 हजार 70 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.