घरठाणेठाणे जिल्हा रुग्णालय पुढील दीड वर्षात सेवेत

ठाणे जिल्हा रुग्णालय पुढील दीड वर्षात सेवेत

Subscribe

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

ठाणे जिल्ह्यासाठी ९०० खाटांचे जिल्हा संदर्भ सेवा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहाच्या बांधकामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी सह्याद्री अतिथिगृहात बैठक घेतली. या बैठकीत चव्हाण यांनी रुग्णालयाच्या निविदापूर्व प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याचे निर्देश प्रशासनाला देताना पुढील दीड वर्षात जिल्हा रुग्णालय सेवेत येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. रुग्णालयाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर तालुके व ग्रामीण भागातील रुग्णांना या प्रस्तावित बहुमजली बहुउद्देशीय रुग्णालयाचा फायदा होणार आहे.

ठाणे जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे महानगरपालिका, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा  शल्यचिकित्सक यांच्या कार्यकक्षेतील विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने जमिनीच्या मालमत्ता पत्रकावर संरक्षण विभागाऐवजी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे यांची नोंद होणे, रुग्णालय बांधकामास पालिकेने तात्काळ मंजुरी देणे, पर्यावरण खात्याची मंजुरी आणणे, अग्निशमन दलाची परवानगी आणणे, इमारतीस अडथळा होणारी झाडे तोडणे अशा विविध कामांना प्रशासकीय मान्यता मिळविण्यासंदर्भात चव्हाण यांनी निर्देश दिले.

- Advertisement -

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे काम जलदगतीने सुरू व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी निश्चित करून याबाबत अधिक वेगाने कामे करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -