घरमहाराष्ट्रशिवसेना-भाजप युती धोक्यात! २०१४ च्या पुनरावृत्तीची शक्यता?

शिवसेना-भाजप युती धोक्यात! २०१४ च्या पुनरावृत्तीची शक्यता?

Subscribe

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजप प्रवेश तर शिवसेनेचा आरेमधील मेट्रो कारशेडला विरोध, ही दोन कारणे युती तुटण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

“आमचं ठरलंय…” असे वाक्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत उद्धृत केले होते. मात्र युतीबाबात शिवसेना-भाजपमध्ये काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजुला आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये अद्याप कोण किती जागा लढवणार यावरच खल सुरु आहे. त्यामुळे २०१४ साली ज्याप्रमाणे शेवटच्या घटकेला युती तुटली होती, त्याप्रमाणेच याहीवर्षी होणार का? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसभेला दिलेले वचन भाजप पाळणार?

लोकसभा निवडणुकीपुर्वी सेना-भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीत जागांचे फिफ्टी-फिफ्टी वाटप, अडीच वर्ष मुख्यमंत्री पद आणि समसमान कॅबिनेट मंत्रीपदे यावर चर्चा झाली होती. तसे आश्वासन भाजपने सेनेला दिले होते. तसेच लोकसभेसोबत विधानसभेच्या युतीची घोषणा करा, अशी मागणी सेनेने केली होती. मात्र विधानसभेच्या युतीची घोषणा आताच नको, असे भाजपच्या चाणक्यांना वाटले आणि सेनेला तसे कळविण्यात आले. लोकसभेच्या निकालानंतर भाजपला मिळालेल्या अभुतपूर्व यशामुळे शिवसेनेच्या फिफ्टी-फिफ्टी जागांच्या मागणीला बाजूला सारण्यात आले आहे. सेनेला सुरुवातील १२० आणि आता ११० जागांचा असा नवा फॉर्म्युला देण्यात येत आहे. त्यातच शिवसेना परंपरागत लढवत असलेल्या जागांवर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेऊ लागले आहेत.

- Advertisement -

आमदार भास्कर जाधव यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावेळी ठाकरेंनी ही नाराजी व्यक्त केली. “आमची यादी मुख्यमंत्री बनवत असून ते मला देतील. त्यानंतर ती यादी शिवसैनिकांकडे आम्ही ठेवू आणि मग युतीची घोषणा करु”, असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून सुमारे एक डझन आमदार भाजपमध्ये आले आहेत. तर अर्धा डझन आमदार शिवसेनेत आलेले आहेत. आमदारांना पक्षात घेतेवेळी त्यांना तिकीट देण्याचे वचन भाजपने दिलेले आहे. एवढ्या आमदारांना कसे सामावून घ्यायचे? असा प्रश्न भाजपसमोर आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र निवडणूक लढण्याची सुरुवात झाली आहे.

आरे आणि राणे, युती तुटण्याला कारणीभूत ठरणार?

उद्धव ठाकरे यांनी रविवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत २८८ जागा लढविण्याची तयारी ठेवा, असा संदेश शिवसैनिकांना दिला. तर आज बेस्टच्या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘जे नाणारचे झाले तेच आरेचे होणार’, असे स्पष्ट केले. मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला आता शिवसेनेने विरोध करत आहे. नाणार प्रकल्पाला ज्याप्रमाणे टोकाचा विरोध करत हा प्रकल्प बंद पाडला त्याप्रमाणेच आरेच्या बाबतीत शिवसेना किती ताणून धरणार हे पाहावे लागेल. तसेच १७ सप्टेंबरला महाजनादेश यात्रा कोकणात जात असून यावेळी नारायण राणेंचा भाजप प्रवेश होणार आहे. सेनेचा आरेला विरोध आणि राणेंचा भाजपच प्रवेश या दोन कळीच्या मुद्द्यावरून युती पुन्हा अडचणीत येऊ शकते.

- Advertisement -

युतीचा फॉर्मुला पित्रुपक्षानंतर ठरणार

राज्यात सध्या पितृपक्ष सुरु असल्या कारणांने नवरात्रीनंतरच जागावाटपाबाबत चर्चा होणार नाही, असे सांगितले जात आहे. तर मुख्यमंत्र्यांची सध्या महाजनादेश यात्रा सुरु असून त्याचा शेवट १९ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणार आहे. तिसऱ्या टप्प्याच्या या समारोपासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही नवरात्र संपण्याची वाट दोन्ही पक्ष का पाहत आहेत? दरम्यान दोन्ही पक्ष स्वबळाची चाचपणी करत आहेत की जागा वाढवून घेण्यासाठी दबाव निर्माण करत आहेत, हे चित्र सध्यातरी स्पष्ट होत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -