घरमुंबईअंतर्गत वादाचा बसणार फटका

अंतर्गत वादाचा बसणार फटका

Subscribe

भायखळ्यात दुहेरी लढत होण्याची शक्यता, मनसेनेकडून उमेदवार नाही

मुंबईतील प्रमुख मतदारसंघापैकी एक म्हणजे मुंबईतील भायखळा हा मतदारसंघ मानला जातो. अरुण गवळीपासून ते आता वारिस पठाण यासारखे अनेक वेगवेगळे उमेदवार याठिकाणी नेहमी पहायला मिळाले. काही वर्षांपूर्वी सेनेचा बालेकिल्ला मानला जाणार्‍या या मतदारसंघात हिंदू मतदारांबरोबर मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असल्याचे दिसून आले आहे. किंबहुना म्हणून गेल्या २०१४ साली याठिकाणी एमआयएमला मुंबईत झेंडा रोवण्यास मदत मिळाली होती. यंदा मात्र यंदा याठिकाणी दुहेरी लढत अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. अंतर्गत गटबाजी आणि राष्ट्रवादीकडून साथ मिळण्याची अपेक्षा कमी असल्याने काँग्रेसला येथून फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हणून याठिकाणी यंदा शिवसेना आणि एमआयएम यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर काहीशा प्रमाणात भायखळा येथील मते गीता गवळी यांच्या पारड्यात पडतील, असे बोलले जात आहे. पण मनसेने याठिकाणी उमेदवार न दिल्याने त्याचा थेट फायदा शिवसेनेला होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती.

मुंबईतील गिरणी कामगारांचे स्थान भाग म्हणून भायखळा मतदारसंघाची ओळख होती. मिल बंद झाल्यानंतर ही ओळख मिटून आता याठिकाणी बहुतांश सगळ्या जाती धर्मांचे लोकवस्ती पहायला मिळाले. काळाचौकी पासून ते नागपड्या पर्यंतचा अनेक भाग या मतदारसंघात येतो. त्यामुळे याठिकाणी मतांचे विभाजन होण्याचे प्रमाण देखील जास्त असल्याचे दिसून आले आहे. किंबहुना म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी कोणत्याही पक्षांला आपले वर्चस्व ठेवण्यात अपयश आले होते. म्हणूनच गेल्या काही निवडणुकीवर नजर मारली असता याठिकाणी दरवेळी नवा चेहर्‍यांना संधी देण्यात आल्याचे दिसून आले आहे. २००९ साली याठिकाणी काँग्रेसचे मधुकर चव्हाण निवडून आले होते. त्यानंतर २०१४ रोजी एमआयएमचे वारिस पठाण यांना संधी देण्यात आली होती. तत्पूर्वी अरुण गवळी यांना देखील या मतदारसंघातून विधी मंडळात पाठविण्यात आले होते. त्यामुळे यंदा देखील अशीच काही परिस्थिती पहायला मिळेल, असे बोलले जात आहे. यंदा शिवसेनेकडून या मतदासंघासाठी महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची पत्नी आणि नगरसेविका यामिनी जाधव यांना संधी देेण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून मधूकर चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर एमआयएमकडून पुन्हा एकदा वारिस पठाण यांच्यावर पक्षाने विश्वास दर्शविला आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय सेनेकडून अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी या देखील मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी कोण जिंकून येते याकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष लागून राहिले आहे. विशेष म्हणजे, एमआयएमचे विद्यमान आमदार असल्याने दिल्लीने देखील याठिकाणी लक्ष केंद्रीय केल्याचे कळते.

- Advertisement -

दरम्यान, सध्याच्या येथील राजकीय परिस्थिती पाहता याठिकाणी यंदा तिहेरी लढत अपेक्षित होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजीने पोखरुन काढलेल्या काँग्रेसला या ठिकाणी देखील फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मधूकर चव्हाण यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधूनच विरोध करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यात राष्ट्रवादीचे येथील अनेक कार्यकर्ते हे सचिन आहिर यांचे समर्थक मानले जात होते. त्यामुळे काँग्रेसला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे,निवडणूक जवळ आली असली तरी अद्याप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संयुक्तिक बैठक देखील झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मुस्लिम मतांची विभागणी होऊ नये म्हणून याठिकाणी समाजवादी पक्षाने आपला उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे मुस्लिम एकगठ्ठा मतदान एमआयएमच्या पारड्यात पडतील,असे बोलले जात आहे. परंतु गेल्या निवडणुकीला मोदी कपाऊंडसारख्या अनेक भागांतील मते ही एमआयएमला पडली होती. परंतु यंदा ही मते विरोधात पडणार असल्याची चित्र आहे,त्यामुळे त्याचा फटका एमआयएमला बसणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच मनसेचे याठिकाणी अनेक बडे नेते कार्यरत आहेत, वाहतुक सेनेचे संजय नाईक, बाळा नादगांवकर यांचे खंदे समर्थक याठिकाणी मोठ्या संख्येने आहेत, मात्र यंदा मनसेने याठिकाणी उमेदवार दिला नसल्याने त्याचा थेट फायदा शिवसेनेला होईल, असे बोलले जात आहेत.

सध्याची उमेदवारांची संख्या लक्षात घेता आणि एकूण मतदारांची संख्या लक्षात घेता याठिकाणी मोठ्या प्रमाणात मत विभाजन होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. त्यामुळे याठिकाणी मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी सर्वच राजकीय पक्षांना रणनिती आखायला लागणार आहे. तसे प्रयत्न देखील सुरु झाल्याचे सध्याच्या मतदारसंघाचा आढावा घेतल्यास दिसून येते. याठिकाणी भाजपकडून देखील मतदारसंघाचा आढावा घेण्याचे काम युध्द पातळीवर सुरु होते. प्रवक्ता शायना एन.सी. ह्या या मतदारसंघातून इच्छुकांच्या यादीत होत्या. परंतु महायुतीने हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ही नाराजी दूर करण्याचे प्रमुख आवाहन शिवसेनेच्या उमेदवारांवर असणार आहे. त्यामुळे यावेळी देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाल्यास नव मतदारांना संधी मिळू शकेल, असे चित्र या मतदारसंघात दिसून येणार आहे. त्यामुळे यंदा या मतदारसंघातून कोण बाजी मारेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -