घरमहाराष्ट्रमहाडमध्ये पुन्हा गोगावले विरुद्ध जगताप झुंज

महाडमध्ये पुन्हा गोगावले विरुद्ध जगताप झुंज

Subscribe

194 महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघात गेली अनेक वर्षे दुरंगी लढतीची स्पर्धा कायम टिकून असून, याहीवेळी पुन्हा हेच चित्र पहावयास मिळणार आहे.या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस आमने सामने येणार आहेत. या मतदारसंघात अद्याप अन्य कोणता राजकीय पक्ष आपले स्थान मजबूत करू शकलेला नाही. मतदारसंघात पर्याय उपलब्ध न होणे किंवा उपलब्ध न करून देणे हे तत्व दोन्ही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी काटेकोर पाळल्याचे दिसते. गेली दहा वर्षे शिवसेनेचे या मतदारसंघावर अधिराज्य आहे. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचा पराभव राष्ट्रवादीचे माणिक जगताप यांनी केला. जगताप यांनी मतदारसंघात विकासाला चालना देण्याचे काम केले मात्र त्यांना पुढच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. २००४ च्या पराभवाचा वचपा २००९ मध्ये भरत गोगावले यांनी तब्बल १४,९६० मतांनी काढत जगताप यांना धूळ चारली. २०१४ च्या निवडणुकीत जगताप राष्ट्रवादीतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढल्याचा फटका जगताप यांना बसला. याच निवडणुकीत भाजप उमेदवाराला ३ हजार ६६ मतांवर समाधान मानावे लागले. मराठा व कुणबी समाजाचे या मतदारसंघात जसे प्राबल्य (६६ टक्के) आहे, तसेच मुस्लीम समाजही (१५ टक्के) आहे.

१९९८ पासून सेना-काँग्रेस अशीच लढत राहीली आहे. यावेळी शिवसेना-भाजप युती होईल यात तूर्त तरी शंका नाही. परंतु युती झाली नाही तर भाजपकडे तगडा उमेदवार नाही. एकमेकावर अवलंबून असलेले हे पक्ष सत्तेसाठी एक होतील, मात्र महाडमध्ये शिवसेनेतील नाराज नेतेच भाजपमध्ये गेल्यामुळे युती झाल्यानंतर ते शिवसेनेचे किती काम करतात, हे येणारा काळच ठरवणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची देखील हीच अवस्था आहे. गेल्या लोकसभेपूर्वीच्या मधल्या काळात जगताप व सुनील तटकरे यांच्यात कायम वादाची ठिणगी पडत होती. आज दोन्ही नेत्यांत सख्य झाले आहे. लोकसभा निवडणुकीत तटकरे यांना विजयी करण्यासाठी जगताप यांनी मेहनत घेतली. या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मात्र दुखावले गेले आहेत. यातील काहींनी शिवसेनेत प्रवेश केला तर काहीजण राष्ट्रवादीतच राहून आपली नाराजी व्यक्त करतील, अशी भीती कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

- Advertisement -

दुर्गम भागात विखरूलेल्या या मतदारसंघातील वीज, पाणी, रस्ते, आरोग्य हे मुद्दे आजही कळीचे आहेत. अनेकदा नेते पक्षांतराच्या कार्यक्रमात तासन्तास घालवत असताना मूलभूत प्रश्नांना म्हणावा तितकासा वेळ देत नाहीत, ही खदखद मतदारांत आहेत. ती नाराजी मतपेटीत दिसणार का, हा औत्सुक्याचा भाग आहे. बदलत्या राजकीय समीकरणात गोगावले की जगताप बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. रायगड जिल्ह्यात काँग्रेसचे बुरुज ढासळत असताना जगताप यांनी महाड नगर पालिका काँग्रेसकडे राखली आहे. गोगावले हेही पक्ष वाढीसाठी प्रामाणिपणे काम करीत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील उत्कंठावर्धक लढतींपैकी महाडची लढत असू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -